मोठी बातमी : नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या, दारुसाठी मित्रानेच घात केला
झुंड अभिनेता बाबू छेत्री यांचे निधन झाले: नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या हिंदी चित्रपटातील कलाकार प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झुंड चित्रपटात (Jhund Movie) प्रियांशु याने महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात त्याने बाबू छत्री (Babu Chhetri) ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याचा विनोदी अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच स्मरणात राहिला होता. त्यामुळे प्रियांशुच्या हत्येच्या घटनेने अनेकांना मोठा धक्का बसला.
प्राथमिक माहितीनुसार, प्रियांशू क्षत्रिय याची नागपूरमध्ये जरीपटका भागात हत्या झाली. प्रियांशूचा मित्र ध्रुव साहू यानेच त्याचा खून केला. प्रियांशु क्षत्रिय आणि ध्रुव साहू यांच्यात मंगळवारी दारुच्या नशेत वाद झाला होता. त्यावेळी ध्रुव साहू याने प्रियांशूवर धारदार शस्त्राने वार करुन त्याला जखमी केले. या हल्ल्यानंतर बाबू छत्री याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी ध्रुव साहू याला अटक केली. झुंड या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्थानिक तरुणांना घेऊन झुंड चित्रपटाचे चित्रीकरण नागपूरमध्ये केले होते. बाबू छत्री याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला झुंड चित्रपटात काम मिळाल्याने त्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रियांशू उर्फ बाबू हा अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता. त्याच्या अंगावर प्लॅस्टिक गुंडाळलेले होते. येथील लोकांना त्याच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन बाबूला तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी बाबूला मृत घोषित केले.
Babu in Jhund Movie: प्रियांशुला झुंड चित्रपटात रोल कसा मिळाला?
प्रियांशू क्षत्रिय याने एका कार्यक्रमात आपल्याला झुंड चित्रपटातील भूमिका कशी मिळाली, याचा किस्सा सांगितला होता. नागपूरमध्ये रेल्वेच्या ट्रॅकजवळच आमची वस्ती आहे. आमचं लहानपण तिथेच गेलं आहे. त्यावेळी मी ट्रेनमधून कोळसा पाडायचो आणि बाकीचे लोकं म्हणजेच माझी टीम ते जमवून विकायचे. त्याचवेळी नागराज मंजुळे यांची एन्ट्री झाली. मी त्यांना पाहिलं आणि मला वाटलं पोलीस आलेत म्हणून मी सर्वांना पळा असे म्हटलं. पण थोड्यावेळाने त्यांच्या हातात कॅमेरा बघितला, तेव्हा आम्हाला वाटलं की अरे हे न्यूज चॅनलवाले आहेत. पोलीस नाही. ते शुटिंग करत होते. त्यावेळी हळूच त्यांनी कॅमेरा आमच्या दिशेने वळवला. मी त्यांना विचारले, हे सर्व काय आहे. तर ते म्हणाले, आमचा प्रोजेक्ट चालू आहे. त्यावर मी पटकन म्हटलं, ते तुमचं प्रोजेक्ट वैगरे असू दे, पण यात वस्तीचे नाव टाकायचे नाही. यामुळे वस्तीचे नाव खराब होते. वस्ती माझी आहे. असे म्हटल्यानतंर ते हसू लागले आणि यानंतरच त्यांनी चित्रपटासाठी विचारणा केली, असे प्रियांशू उर्फ बाबू छत्रीने सांगितले.
आणखी वाचा
‘झुंड’ मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रियला अटक; दागिने आणि रोकड चोरल्याचा आरोप
आणखी वाचा
Comments are closed.