सोनं पोहोचलं सव्वा लाखावर, चांदी विक्रमी पातळीवर पोहोचली, तज्ज्ञांनी सांगितलं अमेरिका कनेक्शन


मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात सुरु असलेल्या वाढीनं नवा टप्पा गाठला आहे. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा दर सव्वा लाखांवर पोहोचला आहे. आजच्या दिवसात सोन्याचा दर 1832 रुपयांनी वाढला. तर, चांदीचे दर 1345 रुपयांनी वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 125452 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा एक किलोचा दर 155306 रुपयांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर महिन्यात सोनं  6450 रुपयांनी महागलं आहे. चांदी 8349 रुपयांनी महागलीय. 2025 मध्ये सोनं 46059 रुपयांनी महागलं तर चांदीचे दर 64766 रुपयांनी वाझले आहेत. तज्ज्ञांनी सोने दरवाढीसाठी अमेरिकेतली शटडाऊन देखील कारण असल्याचं म्हटलंय.

आज 23 कॅरेट सोन्याचे दर 1824 रुपयांनी वाढून 121311 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह याचा दर 124950 रुपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 1678 रुपयांनी वाढून 111568 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 114915 रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्यक्ष बाजारात यापेक्षा दर 1000 ते 2000 रुपयांनी अधिक असू शकतात.

Gold Rate : कॉलिन शहा सोने दरवाढीवर काय म्हणाले?

“घरेलू बाजारात प्रति 10 ग्रॅम ₹1,22,000 आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस $4,000 या स्तरावर पोहोचणं, हे सोन्याने प्रस्थापित केलेलं एक नवीन ऐतिहासिक शिखर आहे,” अशी प्रतिक्रिया कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शहा यांनी दिली आहे. शहा यांच्या मते, जरी जागतिक भू-राजकीय अस्थिरता आणि आर्थिक अनिश्चितता कायम असली, तरी सध्या सोन्याच्या किंमती गगनाला भिडण्यामागे अमेरिकन सरकारचा शटडाऊन हे मुख्य कारण ठरलं आहे.

“या ट्रेन्डमध्ये काहीसा तात्पुरता बदल किंवा स्थिरता दिसून येऊ शकते. मात्र जागतिक बाजारातील सकारात्मक परिणामांमुळे किंमतींचा एकंदर कल चढता राहणार आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $4,037 प्रति औंस आणि देशांतर्गत बाजारात ₹1,30,000 प्रति 10 ग्रॅम या दरांपर्यंत जाऊ शकते,” असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

या किंमतवाढीचा परिणाम म्हणून, जागतिक पातळीवर मागणीत घट झाली आहे, विशेषतः किरकोळ दागिन्यांच्या बाजारपेठेत, जिथे ग्राहकांचे खर्चाबाबत भान अधिक जाणवत आहे.“आजचा ग्राहक अधिक सजग असून, मोठ्या प्रमाणावर बुलियन खरेदीला प्राधान्य देत आहे, जे त्यांना आर्थिक अस्थिरतेपासून सुरक्षित ठेवू शकते,” असे शहा यांनी स्पष्ट केले.

भारतीय बाजारात 9, 14 आणि 18 कॅरेटच्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना वाढती मागणी आहे. यामागे परवडणारी किंमत आणि सणासुदीच्या खरेदीचे वातावरण हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. दुसरीकडे, पारंपरिक जड दागिन्यांची मागणी सध्या काहीशी मंदावलेली असली तरी ती तात्पुरती असून, हिवाळी विवाह हंगामात पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.