सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवला, आता योजनांमध्ये फक्त नवबौद्धांना प्राधान्य
लाडकी बहिन योजना: महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याची माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटींचा निधी सप्टेंबर महिन्याचा हफ्ता देण्यासाठी वळवण्यात आला आहे. त्यामुळे आता साहजिकच सामाजिक न्याय विभागाच्या (Social Justice) योजनांसाठी निधी कमी पडणार आहे. परिणामी आता सामाजिक न्याय विभागाला योजनांसाठी पैसे देताना हात आखडता घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निधीचा वापर अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घेण्याची सूचना महिला व बालकल्याण खात्याकडून देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागानंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana), श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) हफ्ता मिळणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तेव्हापासून म्हणजेच जुलै 2024 ते ऑगस्ट 2025 पर्यंत 14 हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींना मिळाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आले होते. आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागले होते. आता सरकारने सप्टेंबरच्या महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने कोणत्याही क्षणी 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागाअंतर्गत 3960 कोटी इतका नितव्यय मंजूर करण्यात आला आहे.
Ladki Bahin Scheme: लाडक्या बहिणींची संख्या घटणार
राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरु केल्याने दिवसेंदिवस लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील. आता लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं उत्पन्न निकषाप्रमाणं आहे की नाही हे शोधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी लाभार्थी महिलांचे वडील आणि पतीचं उत्पन्न किती आहे, याची तपासणी केली जाणार आहे.
आणखी वाचा
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
आणखी वाचा
Comments are closed.