सप्टेंबरचे 1500 रुपये देण्यासाठी सरकारची निधीची जुळवाजुळव, EKYC पूर्ण नसेल तर पैसे मिळणार का?


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. सामाजिक न्याय विभागानं काल शासन निर्णय प्रसिद्ध करत महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ही रक्कम सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. यावरुन राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची जुळवाजुळव सुरु केल्याचं स्पष्ट झालं आहे. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसला तरी मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana Scheme : सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपये वर्ग

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या काही हप्त्यांच्या वितरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी मिळाल्यानंतर महिला व बाल विकास विभागाकडून सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जारी केला जाणार याबाबतची तारीख जाहीर केली जाऊ शकते.

ई-केवायसी 2 महिन्यात पूर्ण करावी लागणार

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी 18 सप्टेंबरला सर्व लाडक्या बहिणींनी 2 महिन्यात ई केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ई- केवायसी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ दिल्यानं राज्य सरकारकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण करत असताना ज्या महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली नसेल त्यांना देखील 1500 रुपये दिले जातील. मात्र, 2 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे दिले जातील.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ई-केवायसी प्रक्रियेनंतर कमी होण्याची शक्यता आहे. ई- केवायसी प्रक्रियेत महिलेच्या आधार पडताळणी सोबतच पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाची पडताळणी केली जाणार आहे. योजनेच्या नियमानुसारज्या कुटुुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील पात्र महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.

आणखी वाचा

Comments are closed.