बीडच्या उपसरपंचांना आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला झटका, न्यायालयाने जामीन फेटाळला
सोलापूर गुन्हा पूजा गायकवाड: प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (Govind Barge Suicide) यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिचा जामिनाचा अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला. पूजा गायकवाड हिच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आता नजीकच्या काळात तुरुंगाबाहेर येण्याच्या पूजा गायकवाड हिच्या अपेक्षांना या निर्णयामुळे सुरुंग लागला आहे.
पूजा गायकवाड हिने बंगला आणि पाच एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने गोविंद बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजा गायकवाड हिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. याशिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे डॉ. राजपूत तर आरोपीतर्फे अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले.
Dharashiv News: धाराशिवमधील लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात स्पष्ट संदेश दिला आहे.
Beed News: नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.