ते तुम्ही केलंय, अशा टोळीला 12 हत्तीचं बळ मिळालंय; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद टोकाला गेला असून ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबरच्या शासन आदेशाला विरोध करत ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी नेते सरकारवर टीका करत आहेत. तसेच, शासनाने हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर आता लक्ष्मण हाके (Laxman Hake यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. ओबीसी आरक्षणाची मसलत संपल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राज्यात गेल्या 7 वर्षांपासून पंचायतराज निवडणूका झाल्या नव्हत्या. 2022 पुर्वचे आरक्षण ग्राह्य धरुन पंचायतराज निवडणूका घ्या, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ओबीसींना थोडंसं हायसं वाटलं. अनेक ओबीसी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद सदस्य ते नगरसेवक ते महापौर ओबीसी जागेवर होण्याची गुलाबी स्वप्ने पडू लागली पण जरांगें नावाच्या गोलमाल योद्धयाने मुंबई गाठली. सरकारच्या मानगुटीवर बसून हैद्राबाद गॅझेटचा जीआर मंजूर करुन घेतला. बोगस दाखले काढून संरजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबे मारत होते. या बेकायदा जी आरमुळे अशा टोळीला 12 हत्तींचं बळ मिळालंय, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी पत्रातून केला आहे.
हैद्राबाद गॅझेटमुळे कुळातील – गावातील – नातेसंबधातील लोकांना एका ऑफिडिट द्वारे कुणबीकरणाद्वारे ओबीसी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे साहेब ? हा जी आर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो. जे नारायण राणे समितीला जमले नाही , जे गायकवाड आयोगाला जमले नाही ते तुम्ही केलंय, कोर्टात या जी आर ला किती अर्थ आहे हे आम्हाला माहिती आहे. पण आज रोजी ओबीसी आरक्षण संपलंय कारण सुप्रीम कोर्टाच्या भाषेत मराठा जात शासनकरती जात आहे त्यांच्या स्पर्धेत मूळ ओबीसी कसा टिकेल साहेब, असा सवाल हाकेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला आहे.
जरांगे फक्त मुखवटा
साहेब, आम्ही वारंवार सांगतोय जरांगे हा फक्त मुखवटा आहे. त्यांच्या आडून क्रुर मराठा राजकीय नेते आमदार – खासदार – कारखानदार त्यांचा हेतू साध्य करत आहेत. प्रस्थापित मराठा समाजाला सरंपचपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदे स्वतःकडे ठेवायची आहेत. गरजवंत मराठ्यांच्या शिक्षण आणि नोकरीशी जरांगेला देणं घेणं नाही. ईब्लुएसच्या कटऑफचा फरक ओबीसींहून 15 ते 20 गुणांनी कमी आहे. त्यामुळं गजरवंतांची शेकडो लेकरंबाळं पायावर उभारली असती. त्यांचं आयुष्य जरांगे व त्यांच्या आकांनी उध्वस्त केलंय. आम्ही ओबीसी बांधव आतडी तुटोसतर ओरडून सांगतोय. बलूता अलुता सामाजिक मागास यांच्या स्पर्धेत कसा टिकेल हो.. अशी केविलवाणी हाक हाकेंनी पत्राच्या माध्यमातून दिली आहे. जरांगेंचा सगळा खटाटोप राजकीय आरक्षणासाठी होता, यात बळी मात्र ओबीसीचा आणि भटक्या जातसमूहाचा गेलाय, घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांच स्वप्न या एका जी आरद्वारे आपण संपवलाय, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.