मोदी अन् भाजपविषयीचं माझं वक्तव्य प्रामाणिक, मी माझ्या मतावर अजूनही ठामच आहे: महेश कोठारे


Mahesh Kothare on BJP: भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, असे वक्तव्य करणारे मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले होते. महेश कोठारे अशीच वक्तव्यं करत राहिले तर तात्या विंचू येऊन त्यांना चावेल, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली होती. यावर आता महेश कोठारे यांनी भाष्य केले आहे. कोठारे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, हे माझं मत आहे, हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे. मी माझं मत व्यक्त करु शकतो, मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. जे मी म्हटलं ते मनापासून म्हटलं. त्यामुळे इथे राजकारण आणण्याचा संबंधच येत नाही, असे महेश कोठारे यांनी सांगितले.

मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केले. संजय राऊतांनी जे म्हटलं, ते त्यांचं मत होतं. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, असे बोलत महेश कोठारे जोरदार हसले. संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. पण मी माझं मत मांडले. मी या मतावर ठाम आहे. माझं मत निर्विवाद आहे. संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो. पण माझं मत हे माझं मत आहे, असे बोलत महेश कोठारे हे पुन्हा एकदा हसत सुटले.

Mahesh Kothare: महेश कोठारे नेमकं काय म्हणाले?

महेश कोठारे यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.  भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून आणायचा आहे. तसेच यावेळी महापौरही इथून निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी जेव्हा पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हटलं होतं की, येथील मतदार हे खासदार निवडून देत नाहीत तर केंद्रीय मंत्री म्हणून निवडून येत आहेत. आताही आपण या विभागातून फक्त नगरसेवक निवडून देणार नाही. तर भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची ठरवली तर उद्या या विभागातून मुंबईचा महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे यांनी म्हटले होते.  महेश कोठारे यांच्या वक्तव्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Sanjay Raut: संजय राऊतांचं महेश कोठारे यांच्यावर टीकास्त्र

महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला याबद्दल शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही जर असे काही बोलत राहिलात तर रात्री येऊन तो तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, महेश कोठारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याशी वाद घालणे टाळले. मात्र, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही कोठारे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मी मोदी भक्त, भाजप म्हणजे घरचा कार्यक्रम, मुंबईवर कमळ फुलेल; महेश कोठारेंच ‘धडाकेबाज’ वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा

Comments are closed.