गुन्हेगारांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा रिक्षा चालकांकडे; तब्बल 60 बेशिस्त चालकांना ‘खाकी’चा दणक


नाशिक गुन्हे: नाशिक शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी (Nashik Police) सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेला आता दुसरा टप्पा मिळाला असून, बेशिस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रिक्षाचालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गुन्हे शाखेच्या ‘युनिट एक’कडून संशयितांवर ‘फराळ’ वाटपाची मोहीम सुरू असतानाच आता वाहतूक शाखेने रस्त्यावर अराजक माजवणाऱ्या रिक्षाचालकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

नियमांचा सर्रास भंग करणाऱ्या रिक्षाचालकांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे अशा बेशिस्त चालकांना वठणीवर आणण्यासाठी नाशिकच्या वाहतूक विभागासह स्थानिक पोलीस ठाण्यांनी भारतीय न्याय संहिता कलम 285 आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल 18 तासांच्या विशेष कारवाईत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 60 रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या कारवाईमुळे अनेक बेशिस्त चालकांची झोप उडाली असून, शहरवासीयांनी या ठोस कारवाईचे स्वागत केले आहे.

Nashik Crime: ‘सराईत’ रिक्षाचालकांनाही ‘फराळ’

गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये यापूर्वी सराईत गुन्हेगारांना ‘फराळ’ देण्यात आला होता. यात लोंढे, बागुल टोळी, अजय बोरीसा, सनी विठ्ठलकर, मुकेश शहाणे, सनी कदम, राहुल बागमार यांचाही समावेश होता. आता अशाच प्रकारे वाहतूक क्षेत्रातील ‘सराईत’ रिक्षाचालकांनाही फराळाचा झणझणीत फटका बसू लागला आहे.

Nashik Crime: यांनी घेतला मोहिमेत सहभाग

शहरात अनेक भागांत रिक्षाचालकांकडून सायंकाळी सातनंतर अयोग्य वर्तन, दारू पिऊन वाहन चालवणे, तसेच नियमांचे उल्लंघन होतो, याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरिधिका सी. एम. यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तपासण्या सुरू केल्या. या कारवाईत सहाय्यक आयुक्त सुधाकर सुराडकर, अद्विता शिंदे, वाहतूक शाखेच्या सात युनिट्स, आणि शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथकांनी सहभाग घेतला.

Nashik Crime: सराईत रिक्षाचालक आणि ट्रकचालक कारवाईच्या कक्षेत

ही मोहीम केवळ रिक्षाचालकांपुरती मर्यादित नसून, शहरात दहशत माजवणारे सराईत ट्रक व टॅक्सी चालक देखील कारवाईच्या कक्षेत आले आहेत. कोणत्याही वेळी रस्त्यावर सरप्राईज तपासणी करून त्यांच्यावर थेट गुन्हे नोंदवले जात आहेत.

Nashik Crime: समन्स बजावून मुक्तता

कारवाईदरम्यान पोलिसांनी 60 पेक्षा अधिक रिक्षाचालकांची आधार कार्ड माहिती नोंदवली, त्यांना कडक इशारे देत, समन्स पत्रांवर सह्या घेतल्या, आणि नंतर त्यांच्या रिक्षा सोडण्यात आल्या. या कारवाईत नाशिकरोड, पंचवटी, सरकारवाडा, अंबड, देवळाली कॅम्प, मुंबई नाका पोलीस ठाण्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Nashik Crime: शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलिसांची पावले ठाम

शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दिशेने पोलीस प्रशासनाने उचललेली ही ठोस पावले निश्चितच उल्लेखनीय आहेत. अशा बेशिस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका पोचवणाऱ्या चालकांवर नियमित आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.

आणखी वाचा

Nashik Crime Prakash Londhe: ‘बॉस’ लोंढे पिता-पुत्राची दिवाळी तुरुंगात; नाशिक मनपा दुसऱ्या अनधिकृत बंगल्यावरही हातोडा चालवणार?

आणखी वाचा

Comments are closed.