सुनील तटकरेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं; कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा ते चांगलं माहिती


रायगड : जिल्ह्यातील शिवसेना (Shivsena) शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमांधील वाद काही केल्या कमी होताना पाहायला मिळत नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Rupali chakankar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना आमदाराला डिवचलं आहे. यापूर्वी, मंत्री भरत गोगावले यांची नक्कल करत पालकमंत्री पदावरून आणि जिल्ह्यातील राजकारणावरून तटकरे यांनी शिवसेनेला डिवचलं होतं. आता, पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे यांना थेट इशारा दिला आहे.

कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा ते मला चांगलच माहीत आहे, असा इशारा  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना नाव न घेता दिला. त्यामुळे रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वादात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा पार पडली. यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वाक्य काढले. त्यामुळे महायुतीतील हा वाद कायम राहण्याची शक्यता दिसून येत आहे. तसेच, रायगड जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता देखील धुसर असल्याचं स्पष्ट होत आहे.

तटकरेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र

सध्याच्या परिस्थितीत कोणी कोणावर भाष्य करू नका, पक्षाच्या प्रक्रियेद्वारे प्रत्येकाला योग्यवेळी संधी दिली. त्यामुळे आपली योग्य भूमिका ठेऊनच भाष्य करा, असा सल्ला तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. खोपोलीमधील शिवसेनेतून अजित दादांच्या राष्ट्रवादीत आलेले सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील तटकरे यांनी यावेळी केले. त्यामुळे सुनील पाटील यांना राष्ट्रवादीकडून खोपोली नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पालकमंत्री पदावरुन वाद कायम

दरम्यान, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांच्यातील राजकीय वाद जिल्ह्याला परिचित आहे. मात्र, राज्यात महायुती एकत्र असल्याने हे सर्व नेते एकोप्याचा दिखावा करत आहेत. पण, पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी होताना दिसून येते. सध्यातरी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे म्हणजेच आदिती तटकरे यांच्याकडे आहे. तर, भरत गोगावले वेट अँड वॉच अशा भूमिकेत आहेत.

हेही वाचा

खासदारांनी आता स्वत:ची काळजी करावी; जैन बोर्डिंग व्यवहार रद्द, मुरलीधर मोहोळांच्या राजीनाम्यावर स्पष्टच बोलले रविंद्र धंगेकर

आणखी वाचा

Comments are closed.