उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून पलटवार
मुंबई : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत, त्यांना निराशेने घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर दिवसेंदिवस त्यांचे मानसिक संतुलन ढासळत आहे. त्याच मानसिक अवस्थेत आज उद्धव ठाकरे यांनी पुन्हा गरळ ओकली, असे म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातील भाषणावरून त्यांच्यावर पलटवार केला. भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP) आणि आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अमित शाह यांच्यावर केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून अमित शाहांवर (Amit shah) टीका करताना ॲनाकोंडा असे म्हटले होते.
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात, आणि दुसऱ्यांच्या मेहनतीवर फूत्कार काढतात. अमितभाई शाह देशभर फिरून संघटन उभं करतात, राजकारणाला गती देतात, 370 कलम रद्द करून इतिहास रचतात. आणि उद्धव ठाकरे मात्र घरात बसून मोदी आणि अमित भाईंवर टीका करण्याचा उद्योग करतात. या अजगरानं स्वतःच्या पक्षालाच गिळून टाकलं, आपल्या सैनिकांना गिळलं, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वावादी विचारांना गिळलं. 25 वर्षे मुंबई गिळंकृत केली. तो अजगर आज इतरांवर दोष देतोय, अशा शब्दात भाजपने उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे. तो नीच स्तर आम्ही गाठू शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव होणार असल्याचे त्यांना चांगले ठाऊक असल्याने आता स्वतःचे अस्तित्व दाखविण्यासाठी ते अशी विवेकभ्रष्ट टीका करीत आहेत. उद्धव ठाकरे यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्या या विकृत राजकारणाला खुद्द तुमचा कार्यकर्ता कंटाळला आहे. एकवेळ अशी येईल की, मागे वळून बघाल तेव्हा तुमच्यासोबत कुणीही राहणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तर, आशिष शेलार यांनी देखील तीव्र शब्दात उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.
तीच रुदाली, तेच रडणे, तीच मळमळ… त्याच उलट्या..
केंद्रीय मंत्री अमितभाई शहा आहेत मुंबईत येऊन गेले याची भिती आज निर्धार “मेळाव्याच्या चेहऱ्यावर” स्पष्ट दिसत होती. पराभवाची खात्री झालेय हे बोलण्यातून सतत डोकावत होते, अशी टीका उद्धव ठाकरेंवर भाजपाकडून करण्यात आली. एवढेच नवीन सोडले तर, बाकी सगळे तेच ते आणि तेच ते.. तीच रुदाली, तेच रडणे, तीच मळमळ… त्याच उलट्या.. त्याच फुशारक्या.. आणि त्याच वायफाय शब्दांच्या कोट्या.. कट्ट, गट्ट, पट्ट सारखा पांचटपणा ही तोच.., अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रत्युत्तर दिलंय. नाव “विजयाचा संकल्प” आणि बोलण्याला पराभवाचा दर्प, असेही शेलार यांनी म्हटलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.