क्रिकेट दिग्गजांचा जल्लोष! टीम इंडिया जिंकल्यानंतर सचिनपासून कोहलीपर्यंत कोण काय म्हणाले?


IND vs SA महिला विश्वचषक फायनल 2025 : भारतीय महिला संघाने 2025 च्या महिला विश्वचषकाचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आपला पहिला आयसीसी किताब (India Won Women’s World Cup 2025) जिंकत देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. रविवारी, 2 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत विश्वविजेतेपदावर नाव कोरलं.

या ऐतिहासिक विजयावर भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सचिन तेंडुलकरपासून ते वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीपर्यंत सर्वांनी संघाचे अभिनंदन केले. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही भारतीय महिला संघाचे कौतुक करत विशेष पोस्ट शेअर केली.

सचिन तेंडुलकरचा 1983 चा उल्लेख

सचिन तेंडुलकर यांनी लिहिलं की, “1983 च्या विजयाने अनेक पिढ्यांना मोठं स्वप्न बघण्याची आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. आज आपल्या महिला क्रिकेट संघाने तसंच काहीतरी विशेष केलं आहे. त्यांनी देशभरातील असंख्य मुलींना बॅट आणि बॉल हाती घेऊन मैदानात उतरायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला प्रेरित केलं आहे.”

अनिल कुंबळे यांची प्रतिक्रिया

अनिल कुंबळे यांनी लिहिलं, “सुरुवातीपासून शेवटपर्यंत अप्रतिम कामगिरी. शिस्तबद्ध, निडर आणि एकजूट असलेली. हा विजय संघाच्या सातत्य आणि दबावाखाली शांत राहण्याच्या क्षमतेचं प्रतीक आहे. दक्षिण आफ्रिकेलाही श्रेय द्यायलाच हवं, त्यांनीही संपूर्ण दमदार खेळ केला आणि अंतिम सामना खऱ्या चॅम्पियन्ससारखा बनवला.”

वीरेंद्र सेहवाग म्हणाला “चॅम्पियन्स!”

वीरेंद्र सेहवाग याने एक्सवर लिहिलं की, “चॅम्पियन्स! प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट आणि त्यांच्या जिद्दीने संपूर्ण देशाचं हृदय जिंकलं. आपल्या विश्वविजेत्या मुलींचा आम्हाला अभिमान आहे. हरमनप्रीत आणि तिच्या संघाने संपूर्ण पिढीला जिंकण्याचं, लढण्याचं स्वप्न दिलं आहे.”

इरफान पथ Catuks लिलाव

इरफान पठान म्हणाले, “भारतीय महिला संघाला विश्वचषक विजयाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा. जबरदस्त खेळ. दीप्ती शर्मा, तुम्ही अप्रतिम आहात. शेफाली, शाब्बास!”

हरभजन आणि अश्विन यांने पण केलं कौतुक

हरभजन सिंह यांनी लिहिलं, “आपण चॅम्पियन्स आहोत! शाब्बास टीम इंडिया, आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे. भारत महान होता आणि सदैव महान राहील. जय हिंद.” आर. अश्विन यांनीही अभिनंदन करत म्हटलं, “भारतीय महिला क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन. ही एक अफलातून मोहीम होती. खेळाडू आणि अमोल मजूमदार यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक संघाचंही अभिनंदन.”

विराट कोहली काय म्हणाला?

विराट कोहली म्हणाला की, तुम्ही पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरला आहात. तुमच्या निर्भय खेळाने आणि विश्वासाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान वाढवला आहे. तुम्ही सगळ्या गौरवाचे खरे हकदार आहात. हार्दिक अभिनंदन हरमन आणि संपूर्ण टीमला. जय हिंद.

रोहित शर्मा भावूक

महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच रोहित शर्मा डी.वाय.पाटील स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याची पत्नी रितिका सजदेह देखील उपस्थित होती.


सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा हिने 87 तर दीप्ती शर्माने 58 धावा केल्या. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिका 45.3 षटकांत 246 धावांवर गारद झाली. गोलंदाजीत दीप्तीने 5 तर शेफालीने 2 बळी घेतले. भारताच्या या विजयाने महिला क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला असून, संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी ठरली आहे.

हे ही वाचा –

IND vs SA Womens World Cup Final 2025 Prize Money: ICC कडून दक्षिण अफ्रिकेला 20 कोटी रुपये, विश्वचषक जिंकणाऱ्या भारताला किती रुपयांचं बक्षीस?; BCCI ने जाहीर केलेल्या बक्षीसानं डोळे चक्रावले!

आणखी वाचा

Comments are closed.