लकी स्कोरर्स… ‘स्कोरर बॉक्स’मधून अनुभवला विश्वचषक विजयाचा आनंदोत्सव
2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास लिहिला गेला. काही जणांनी हा इतिहास घडताना थेट स्टेडियममधून आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यापैकीच एक होते स्कोरर बॉक्समध्ये बसलेले चार लकी स्कोरर्स. क्रिकेट स्कोरर हा क्रिकेट सामन्यातला अविभाज्य भाग. आयसीसी महिला वन डे विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्कोरिंग करण्याची अर्थात गुणलेखनाची जबाबदारी होती ती बीसीसीआयच्या मुंबईतील चार अनुभवी स्कोरर्सकडे. सुबोध वैद्य, रुपेश प्रभुदेसाई, क्षमा साने आणि सुषमा सावंत. या चौघांसाठी हा विश्वचषक अविस्मरणीय ठरला.
या स्कोरर्सपैकी एक आणि गेली अनेक वर्ष बीसीसीआयच्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तसंच आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गुणलेखन करणारे स्कोरर सुबोध वैद्य यांनी 2 नोव्हेंबरच्या त्या अविस्मरणीय सामन्याचा अनुभव एबीपी माझासोबत शेअर केला.
“विश्वचषक विजयाचा आनंदोत्सव”
एक क्रिकेट गुणलेखक अर्थात स्कोअरर जो अनुभवू शकतो पण सहभागी होऊ शकत नाही. क्रिकेट पंच असो वा स्कोरर हे तटस्थ भूमिकेत असतात आणि असायलाच हवेत. सामना सुरू असताना कुठलीही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद सांभाळावा लागतोच. सामना संपल्यावर स्कोररला ठराविक गोष्टी पूर्ण करायच्या असतात, कोठलाही – कोणताही सामना असो. स्कोअरकार्ड पूर्ण करणे, पंचांच्या सहमतीने ते योग्य आहे हे शिक्कामोर्तब करणे. ह्या सगळ्या बाबी झाल्यावरच सोहळा पहाता येतो.
रविवारचा सामनाही तसाच अनुभवला. पण खात्रीने सांगतो, प्रत्येक स्कोररच्या मनात अशा सामन्यात गुणलेखन करायला मिळणं ही एक पर्वणीच असते. माझ्या भाळी उपांत्य सामना व अंतिम सामना हे दोन्ही लिहिले होते. त्यामुळे माझा आनंद किती पटीने होता हे सांगणे न लगे.
2011 चा विश्वचषक सामना आकाशवाणी केंद्रात समालोचन कक्षातून पाहिला आणि करोडो लोकांपर्यंत पोहोचवला तर 2025 चा सामना स्कोरर बॉक्समध्ये बसून कागदावर चितारला. त्यामुळे माझ्यासारखा भाग्यवान मीच. प्रत्येक चेंडूवरचा थरार आणि क्षणागणिक होणारी उत्कंठा दिसत होती. आजूबाजूला बसलेले क्रीडा पत्रकार आणि त्यांची ऊर्जा, त्यांचा उत्साह अनुभवता आला. सहकारी स्कोअरर्स बरोबरचा व टीव्ही अंपायर सोबतचा संवाद तसेच प्रेक्षागृहातील कोलाहल कानात साठवून ठेवला आहे.
क्षणाक्षणाला आनंदाची धग जाणवत होती. शांत डोक्याने कुठलीही आगळीक न करता आपलं कार्य, न चुकता वा गडबडता पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडत होतो. आयसीसीसाठीचं स्कोअरकार्ड प्रचंड जबाबदारीने पार पाडायचं होतं. काहीसं किचकट पण अतिशय महत्वपूर्ण काम करण्याची संधी मिळालेली. सहकारी सुषमा व रुपेश यांच्या साथीने ती नौका तारली.
एक नवा अध्याय लिहिण्याचं कसब पूर्णत्वास नेलं याचा आनंद आहे. महिला क्रिकेट खासकरून भारतीय महिलांसाठी ही नवी सुरुवात आहे. ह्या प्रक्रियेचा एक भाग व्ह्यायला मिळालं यासाठी खरं तर बीसीसीआयचे आभार!
महिला क्रिकेट संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन…!!
आणखी वाचा
Comments are closed.