300 कोटी गुंतवताना एक वडील म्हणून पार्थने तुम्हाला विचारलं नाही का? अजित पवार म्हणाले….
अजित पवार आणि पार्थ पवार पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात एकाही पैशाची देवाणघेवाण झाली नाही. या प्रकरणात केवळ नोंदणी करुन खरेदीखत तयार करण्यात आले होते. ही गोष्ट वगळता या व्यवहारात एकाही पैशाचा व्यवहार झालेला नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांचे पुत्र असलेल्या पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्यासाठी ही जमीन विकत घेतली होती. या व्यवहारात 21 कोटींचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली होती. या सगळ्यावरुन प्रचंड राजकीय गदारोळ निर्माण झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्याला मुलाच्या या व्यवहाराविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगत हात झटकले होते. परंतु, शनिवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या सगळ्याविषयी सविस्तरपणे भाष्य केले.
यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना, तुम्हाला आपल्या मुलाच्या व्यवहाराची माहिती कशी नाही, असा प्रश्न विचारला. पण एक वडील म्हणून पार्थ पवारांनी तुम्हाला विचारलं नाही का? मी अमुकतमुक प्रोजेक्टमध्ये 300-400 कोटी रुपये गुंतवतोय, काय करु, असे त्यांनी विचारलं नाही का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, अरे पण या प्रकल्पात एकही रुपया गुंतवला नाही. मला तेच समजत नाही, एक रुपयाही न देता इतर सगळं कसं झालं, असे अजित पवार यांनी म्हटले. मी आता प्रशासनालाच एक सल्ला दिला आहे. इथून पुढे माझ्या जवळचे किंवा लांबचे नातेवाईक अशाप्रकारे काही गैरव्यवहार करत असतील किंवा काही चूक करत असतील किंवा कोणाच्या सांगण्यावरुन त्यांच्याकडून चूक घडत असेल ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करु नका. अजिबात कोणाच्या दबावाला घाबरु नका. मी आयुष्यात कधीही अशा गोष्टींचे समर्थन केले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
Parth Pawar news: अजितदादांनी मुलाला काय सल्ला दिला?
पार्थ मुंबईत आहे, मी उद्या रात्री मुंबईत जाईन. मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे, हे जे काही प्रकरण झालं यामधून तुम्ही लोकांनी काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. कारण माणूस अनुभवातून नवीननवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय, त्याची सुरुवात आहे. पुन्हा असल्या कुठल्याही पद्धतीने, काही लोकांवर आपला खूप विश्वास असतो. त्या लोकांनी काही गोष्टी सांगितल्या तरी त्यामधील तज्ज्ञ माणूस असतो, भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल. आपल्याकडे चांगल्या सल्लागारांची आणि वकिलांची टीम आहे. त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावे, असे अजित पवार यांनी म्हटले.
मुंढवा जमीन व्यवहारात खरेदी खतच व्हायला नको होतं, पण ते झालं. मी ती कागदपत्रं बघितली, तेव्हा रजिस्ट्रारने नोंदणी कशी केली, तेच कळत नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, याप्रकरणात योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे. गेल्या 35 वर्षात माझ्यावर अनेकदा राजकीय आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाहीत. पण प्रचंड बदनामी झाली. बोपोडी येथील अंडी उबवण केंद्राच्या जमीन व्यवहाराबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमधील सगळे अधिकारी प्रामाणिक आहेत. मुंढवा जमीन व्यवहारात नोंदणीच होणे शक्य नव्हते तर ते करण्याचे धाडस काहीजणांनी दाखवले. ते कशामुळे दाखवले, फोन करुन कोणी दबाव आणला का, याचा तपास करायला सांगितला आहे. चौकशी झाल्यावर याबाबतची वस्तुस्थिती कळेल. काही प्रसारमाध्यमांनी बोपोडी जमीन व्यवहारातही आमच्या कुटुंबाचा संबंध असल्याच्या बातम्या दाखवल्या. या व्यवहारात पार्थ पवार यांचा काडीइतका काय नखाइतकाही संबंध नव्हता, असे अजित पवार यांनी सांगितले.
Pune News: पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही? अजित पवार म्हणाले…
या प्रकरणात पार्थ पवार सकृतदर्शनी दोषी आहेत की नाही, असा प्रश्न यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी म्हटले की, या प्रकरणात सगळी कागदपत्रं न बघता व्यवहार झाला. आम्ही व्यवहार करतो, त्यावेळी टॉपचे वकील असतात, त्यांना तपासायला सांगतो. त्यांनी तपासल्यावर जमीन घेऊ शकता असे सांगितलं की, आपण पुढे पाऊल टाकतो. कधीकधी नोटीस पण देतात, ही जमीन खरेदी करतोय, त्याबाबत आक्षेप आहे का? विचारले जाते. पण मुंढवा जमीन व्यवहारात या कुठल्याही गोष्टी करण्यात आल्या नाहीत. मला हा व्यवहार झालेला माहिती नाही. नाहीतर मी सांगितलं असतं करु नका, असे अजित पवारांनी म्हटले.
आणखी वाचा
शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण
आणखी वाचा
Comments are closed.