शेतकऱ्यांचा संताप उफाळला! स्थानिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा; सत्ताधारी, विरोध
नाशिक निवडणूक 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं (Local Body Elections) बिगुल वाजलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकांमध्ये शेतकरी हा प्रमुख मुद्दा ठरणार असून, विविध शेतकरी संघटनांनी सत्ताधारी आणि विरोधकांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या न सोडवलेल्या प्रश्नांमुळे आता त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा किंवा स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचा निर्धार केला आहे.
Nashik Elections 2025: महायुती आणि महाविकास आघाडीवर शेतकऱ्यांचा रोष
नाशिकमधील प्रमुख शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाचे दर, कांदा निर्यातबंदी, पाणी व्यवस्थापन, वीजदरवाढ, कर्जमाफीतील विलंब आणि विमा नुकसान भरपाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. सत्तेत असो वा विरोधात दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांची फसवणूकच झाली, अशी भावना ग्रामीण भागात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे या वेळेस शेतकरी ‘ना महायुती, ना महाआघाडी’ अशा भूमिकेत राहून स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिसरा पर्याय रिंगणात उतरवतील, असा सूर शेतकरी संघटनांकडून उमटत आहे.
Nashik Elections 2025: निवडणुकीत ‘शेतकरी प्रश्न’ ठरणार केंद्रबिंदू
या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील आगामी निवडणुका शेतकऱ्यांच्या प्रश्नांभोवती फिरणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील अस्थिरता, कांदा उत्पादकांचा तोटा आणि शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न हे सगळे मुद्दे स्थानिक निवडणुकीतील प्रचाराचा गाभा ठरणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेतकरी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडी शेतकऱ्यांची मनधरणी कशी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील भगूर,मनमाड,नांदगाव, सटाणा, येवला, सिन्नर, चांदवड, इगतपुरी, ओझर,पिंपळगाव बसवंत आणि त्र्यंबकेश्वर या नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील अध्यक्षपदासाठी त्र्यंबकेश्वर, येवला ओबीसी (पुरुष) तर सटाणा, इगतपुरी आणि भगूर या ओबीसी महिला प्रवर्गाकरिता राखीव झाल्या होत्या. तर सिन्नर, नांदगाव आणि मनमाड या नगरपरिषदा अध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गाकरिता आरक्षित झाल्या होत्या. याशिवाय पिंपळगाव बसवंत अनुसूचित जमाती खुला आणि चांदवड अनुसूचित जाती व ओझर अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या होत्या. त्यानंतर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.
Maharashtra Local Body Elections Timetable : असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.