सोन्याची 1.5 टक्क्याने उसळी! चांदीने दीड लाखांचा टप्पा ओलांडला, सोन्याची तोळ्यामागे किंमत किती?


सोन्या-चांदीचे आजचे भाव: सोने बाजारात गेल्या काही दिवसात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या किमतीतील बदल आणि आंतरराष्ट्रीय राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत असून देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव झपाट्याने वाढताना दिसतोय. सोमवारी (10 नोव्हेंबर) सकाळच्या सत्रात एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. (Gold Prices)

Gold Silver Prices: सोने-चांदी दरात मोठी वाढ

सकाळी 11.23 वाजता सोन्याचे दर 1.15 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम ₹1,22,650 वर होते. त्याचवेळी चांदी जवळपास 2 टक्क्यांनी वाढून प्रति किलो ₹1,51,050 वर पोहोचलीय. मुंबईतील सराफा बाजारात, 24 कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत ही 1 लाख 23 हजार 140 रुपये एवढी झाली आहे. तोळ्यामागे सोन्याचा दर  1 लाख 43 हजार 628 रुपये आहे. 22 कॅरेट सोनं 1 लाख 12 हजार 878 रुपयांवर पोहोचले असून किलोमागे चांदीचा दर एक लाख 51 हजार 650 रुपयांवर पोहोचलाय. (Gold Rate)

का वाढतायत सोन्या-चांदीच्या किमती?

– ऑक्टोबरमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किमतीत घसरण झाली होती. पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयी वाढत्या चिंतेमुळे आणि यूएस फेडकडून डिसेंबरमध्ये व्याजदर कपात होण्याची शक्यता असल्याने सोन्याला पुन्हा झळाळी आलीय.

– अमेरिकेत सरकारी कामबंद  सलग 40 व्या दिवशी सुरू असल्याने रोजगार बाजार आणि ग्राहक भावना दोन्ही कमकुवत झाल्याचे ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे. ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घ शटडाऊन ठरत आहे. यूएस शटडाऊनचा विक्रमी कालावधी अर्थव्यवस्थेवरील धोका वाढवतोय. डॉलरसुद्धा कमकुवत झाला असून त्यामुळे बुुलियन किमतींना आधार मिळत असल्याचं तज्ञांनी सांगितलं.

– जागतिक स्तरावर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका व युरोपमधील अनेक देश व्याजदरात बदल करण्याच्या हालचाली करत आहेत त्यामुळे चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून सोने सुरक्षित पर्याय असल्यामुळे त्याची खरेदी वाढली आहे.

– देशांतर्गत बाजारात लग्नसराई व सणासुदीचे वातावरण कायम असल्याने दागिन्यांची मागणी वाढलेली दिसते.

ट्रेडर्सना फेडचे संकेत स्पष्ट

सीएमई फेडवॉच टूलनुसार, डिसेंबरमध्ये दरकपात होण्याची शक्यता सुमारे 67 टक्के आहे. या अपेक्षांमुळे सोन्यात सुरक्षित गुंतवणूक वाढत आहे. सोन्याने 1 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी घेतली.  डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला जोर मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. सोन्याच्या किमतीत चढउतार राहतील, त्यामुळे घसरण झाल्यावर खरेदी करावी. असा तज्ञांचा रोख आहे.

आणखी वाचा

Comments are closed.