पुणे महानगरपालिकेसाठी वॉर्ड आरक्षण जाहीर, बड्या नगरसेवकांचा पत्ता कट होणार, कोणाकोणाला फटका?


पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी (Pune Mahanagarpalika Election 2025)आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे. आरक्षण सोडतील अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्याचं चित्र आहे. अनेक नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक (Pune Mahanagarpalika Election 2025) लढवावी लागणार आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे, प्रकाश कदम यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. (Pune Mahanagarpalika Election 2025)

यावेळी धंगेकर आणि बिडकर हाय होल्टेज सामना होणार नाही. प्रभाग क्र. 24 मध्ये ओबीसी महिला आरक्षण पडल्याने धंगेकर यांच्या पत्नी तर सर्वसाधारण जागेवरून गणेश बिडकर यांना निवडणुक लढवावी लागेल. २०१७ ला मोदी लाटेत धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. पुणे महानगरपालिका निवडणूक युती आघाडीत काय होतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला पक्षांनी जोरदार सुरूवात केली आहे. आयोगाकडून आणि प्रशासनाकडून याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहेच. राजकीय पक्षाकडूनही उमेदवारांची जुळवाजुळव केली जात आहे. अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसलाय. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत.

165 जागांसाठी ही आरक्षण सोडत महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे. (Pune Mahanagarpalika Election 2025) महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.(Pune Mahanagarpalika Election 2025)

प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात  हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

२०११ सालच्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ इतकी सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे.

आणखी वाचा

Comments are closed.