तोपर्यंत साईट चालू करायची नाही, अन्यथा ठार मारीन; बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली खंडणी, शिंदे ग
कल्याण गुन्हे: कल्याणजवळील वडवली परिसरात बांधकाम व्यावसायिकाला धमकावून खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या (शिंदे गट) युवा सेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवकाचा मुलगा वैभव पाटील (Vaibhav) याच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ‘मंगेशी कन्स्ट्रक्शन’च्या साइटवर येऊन आरोपींनी काम बंद पाडले, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याचा विकासकाचा आरोप आहे तर निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून, व्यावसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप वैभव पाटील यांनी केला आहे. सध्या याप्रकरणी खडकपाडा पोलिसानी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. (Kalyan Crime)
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण पश्चिममधील बांधकाम व्यावसायिक मंगेश दशरथ गायकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गायकर यांची वडवली परिसरात ‘मंगेश स्टार’, ‘मंगेशी हेवन’ आणि ‘मंगेशी जेमिनी’ या नावाचे बांधकाम प्रकल्प (प्रोजेक्ट) सुरू आहेत. 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.33 वाजता वैभव दुर्योधन पाटील आणि सुनिल राजाराम पाटील यांच्यासह एकूण 7 आरोपींनी (पंकज पाटील, उद्धव पाटील, तेजस पाटील, ध्रुव पाटील, करण पाटील) बेकायदेशीररित्या साइटवर येऊन कामगार आणि कंत्राटदारांना व ऑफिस स्टाफला शिवीगाळ करत काम पूर्णपणे बंद पाडले.
Kalyan Crime: नाहीतर जीवे ठार मारीन
हा एरिया आमचा आहे. माल आमच्याकडून घ्यावा लागेल. माल नाही घेतल्यास प्रत्येक गाडीमागे 3,000 रुपये द्यावे लागतील, अशी अवैध पैशांची मागणी करत आम्ही सांगत नाही तोपर्यंत साईट चालू करायची नाही, नाहीतर जीवे ठार मारीन, अशी थेट धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी दोन वेळा अशाच प्रकारे धमक्या देऊन डिमांड करत होते ही त्यांची तिसरी वेळ होती, त्यामुळे यापुढे दादागिरी सहन न करण्याचा निर्णय घेत पोलिसांत धाव घेतल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. कामासाठी तांत्रिक कौशल्ये (टेक्निकल स्किल) असलेल्या कामगारांची गरज असते, त्यामुळे सर्व स्थानिक लोकांना काम देणे शक्य नसते, असे त्यांनी स्पष्ट करत आरोपींना लवकरात लवकर अटक करून कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.
Kalyan Crime: वैभव पाटलांनी सर्व आरोप फेटाळले
तर मंगेश गायकर यांच्या आरोप आणि तक्रारीनंतर युवा सेना उपशहर प्रमुख आणि आरोपी वैभव पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळत मी स्थानिक व्यावसायिक, गावातील स्थानिक तरुणांना काम मिळावे, यासाठी बांधकाम व्यावसायिकांशी दोन वेळा बैठका घेतल्या होत्या, पण काम दिले नाही. आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 20 दिवसांनंतर गुन्हा दाखल करणे, हे संशयास्पद आहे. ”मी हप्ते मागत असेल, तर त्यांनी पुरावा द्यावा. मी तसे काहीही मागितलेले नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन विरोधकांनी रचलेला हा डाव असून, व्यावसायिकाला हाताशी धरून चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रति-आरोप वैभव पाटील यांनी केला आहे. सध्या याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.