मला विरोध करण्यासाठी नाथरामधील फार्म हाऊसवर बैठका, राष्ट्रवादीचे आमदार सोळंकेंचा मुंडेंवर आरोप
प्रकाश सोळंके : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. माजलगाव मतदार संघातील माझे विरोधक व त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांची परळी तालुक्यातील नाथरा येथील फार्म हाऊसवर बैठका होत आहेत. याबाबतची चर्चा संपूर्ण मतदारसंघात असल्याचे प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. याबाबत आपण पक्षश्रेष्ठींना अजित पवारांना यापूर्वीच कल्पना दिल्याची माहिती प्रकाश सोळंकी यांनी दिली आहे.
विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते
विधानसभेत देखील माझ्या विरोधात त्यांनी दोन दोन उमेदवार उभे केले होते, तेच आता देखील होणार आहे, असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. दरम्यान माझ्या मतदारसंघातील धारुर व माजलगाव या नगरपालिकेच्या निवडणुका होत असून या ठिकाणी युती होईल अशी अपेक्षा होती. परंतू, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या दोन्ही ठिकाणी भाजपच्या माध्यमातून स्वतंत्र पॅनल दिला आहे. त्यामुळं आमची राजकीय ताकद वापरुन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे प्रकाश सोळुंके यांनी म्हटले आहे. दरम्यान, आता आमदार सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची पक्ष काय दखल घेतो आणि धनंजय मुंडे या सर्व आरोपांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच सगळं काही ठीक असल्याचं चित्र दिसत नाही
दरम्यान, 4 नोव्हेंबरला राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रराजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांचे नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच सगळं काही ठीक असल्याचं चित्र दिसत नाही.
पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यासाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.