माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिली? बाप-लेकाला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण; बीडमधील धक
बीड क्राईम न्यूज: बीड शहरातील पेठ बीड परिसरात घरावर झालेल्या हल्ल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचा राग मनात धरून 66 वर्षीय सदाशिव कोकाट आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर कोकाट यांना भररस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed Police Station) पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Crime News: आधी घरावर हल्ला, नंतर रस्त्यात मारहाण
11 फेब्रुवारी रोजी पेठ बीड भागात सदाशिव कोकाट यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. लाठ्या-काठ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आले आणि विजयमाला कोकाट यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात माझे नाव का टाकले, असा जाब विचारत पाच जणांनी सदाशिव कोकाट आणि त्यांच्या मुलाला रस्त्यात अडवून मारहाण केली आहे.
Beed Crime News: “नाव काढून घे, नाहीतर 307 मध्ये अडकवू”
मारहाण करताना आरोपींनी “तू टाकलेल्या गुन्ह्यातून माझे नाव काढून घे, नाहीतर तुलाच 307 (खुनाचा प्रयत्न) मध्ये अडकवू,” अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. दोन तरुणींसह पाच जणांनी अश्लील शिवीगाळ करत बाप-लेकाला बेदम मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित जमावातील काही जण “भैया, तो मरून जाईल रे… मारू नको,” अशी विनवणी करत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. तसेच “जर यांना कोणी नेलं तर सगळेच गुंतणार,” अशी धमकी तरुणींनी दिल्याचाही आरोप आहे.
Beed Crime News: तिघे जण जखमी; जिल्हा रुग्णालयात उपचार
दोन्ही घटनांमध्ये कोकाट कुटुंबातील तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात पाच आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना तात्काळ अटक न केल्यास ते आमच्यातील एखाद्याचा जीव घेतील, अशी भीती जखमींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे बीड शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.