मुख्यमंत्र्यांच्या भाषणात फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसतयं, महाराष्ट्राला धमकावून चालणार नाही; आदित्य ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात
मुंबईत अतिवृष्टीने पडलेली झाडे, ठिकठिकाणी पाणी साठून झालेली वाहतूककोंडी, मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन तास भाषण केलं. यावेळी मुंबईतील प्रश्नांवर बोलण्याऐवजी सरकारच्या चुका दाखवणाऱ्या विरोधकांवर फडणवीस यांनी आगपाखड केली. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात नैराश्य स्पष्टपणे दिसलं पण ते फ्रस्ट्रेशन फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काल 2 तास भाषण खेचलं. त्यात फक्त थापा मारल्या. पण त्या भाषणातून त्यांचं फ्रस्ट्रेशन स्पष्ट दिसत होतं. बऱ्याचदा अहंकार (Arrogance) हेच नैराश्याचं लक्षण असतं. मुख्यमंत्री महोदयांच्या रूपात काल याचं जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. मुख्यमंत्री म्हणून हे त्यांचं कदाचित शेवटचं अधिवेशन आहे. कदाचित त्यांना दिल्लीत नेऊन बळजबरीने केंद्रीय कॅबिनेट मंत्री केलं जाईल, जसं शिवराजसिंह चौहान यांना केलं गेलं. पण ते त्यांचं फ्रस्ट्रेशन महाराष्ट्राच्या जनतेवर काढतायत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
‘जर विरोधी पक्षाने विचारलेले प्रश्न तुम्हाला एवढे झोंबत असतील, तर मग तुम्ही त्या खुर्चीवर बसलाच कशाला? तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर बसला आहात, तिथे लोक तुम्हाला सवाल करणारच. जर भ्रष्टाचार केला असेल, पैसा खाल्ला असेल तर, टीकाही सहन करावी लागेल. लोक प्रश्न विचारणार आणि तुम्हाला उत्तर देणं गरजेच आहे. ज्या खुर्चीवर आज तुम्ही आहात तुम्ही राजा नाही जनतेचे सेवेक आहात. त्यामुळे जनता प्रत्येक वेळी तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. महाराष्ट्राला धमकावून चालणार नाही. तुम्ही हिंदीत धमकावा, इंग्लिशमध्ये धमकावा की फ्रेंचमध्ये, आम्ही तुमच्या धमक्यांना ऐकून घेणार नाही. आम्ही प्रश्न विचारतच राहू आणि तुम्ही केलेले घोटाळे, भ्रष्टाचार आणि मारलेल्या थापा उघड्या पाडत राहू, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
आम्ही देशाच्या जनतेसोबत आहोत, भाजपसोबत कधीही जाणार नाही. आमच्यावर कितीही दबाव टाकला, आम्हाला खेचण्याचा प्रयत्न केला किंवा आमिषं दाखवली, तरी आम्ही देशविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया करणार नाही. कारण भाजप हा खऱ्या अर्थाने हिंदूविरोधी आणि देशद्रोही आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. सध्या देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज, त्यांचं फ्रस्ट्रेशन आणि अहंकार पाहून एक गोष्ट नक्की दिसतेय की, भाजप त्यांना आता जास्त काळ महाराष्ट्रात ठेवणार नाही, त्यांना दिल्लीत केंद्रीय मंत्री केलं जाईल. आता या ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ मध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री आत्ताच्या काळात होईल की मिंधे गटातून केला जाईल, आणि संघ (RSS) व भाजप हे कसं ऐेकून घेईल, हे पाहण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. पण हे सर्व होत असताना, जर त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांनी तसं जाहीर बोलावं, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.
“म्हात्रेची धिंड काढून नगरसेवक पद तातडीने बरखास्त करा”
डोंबिवलीतील डॉक्टरांच्या मारहाण प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, काल डोंबिवलीतील डॉक्टर आणि नर्सेससोबत भेट झाल्यानंतर रमेश म्हात्रेंना अटक झाली. मात्र, त्यानंतर त्यांच्या तब्येत बिघडल्यामुळे आता त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात आलेलं आहे. ज्यामुळे तुम्हाला अटक झाली, त्याचा आश्रय घेऊन त्याच्याच मागे लपण्याचा प्रयत्न केला जातोय. मग गृहखातं नेमके काय करत आहे? या व्यक्तीला आत टाकण्यासाठी काय प्रयत्न करतायत? की इथेही ‘फेकनाथ मिंधेंच फडणवीस साहेब एकणार आहेत हे येत्या पुढच्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. या प्रकरणातील डॉक्टर्स आणि नर्सेस न्याय मागत आहेत. कडक कारवाई, शिक्षा मागत आहेत. त्यामुळे रमेश म्हात्रेची धिंड काढली पाहिजे. आणि त्यांचं नगरसेवक पद तातडीने बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केलीय.
आमच्या काळातही काही मंत्र्यांवर आरोप झाले (जसे संजय राठोड किंवा इतर मंत्री), तेव्हा आम्ही पहिल्यांदा त्यांना त्यांच्या मंत्रीपदावरून दूर केलं होतं. तीच अपेक्षा आमची आज मिंधेकडून आहे की, त्यांनी या नगरसेवकाला तातडीने पदावरून बडतर्फ केलं पाहिजे. आता तर फक्त मारहाण केल्याचा व्हिडिओच नाही तर, त्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे, ज्यामध्ये अत्यंत घाणेरड्या शब्दांचा वापर केला गेला आहे. त्यामुळे त्याला बरखास्त करून त्याची धिंड काढली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. तरच त्या डॉक्टरांना न्याय मिळेल, असे ते यावेळी म्हणाले.
समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात देशी दारू विकली जात असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग असो किंवा इतर महामार्ग, आधी तिथल्या रस्त्यांचा दर्जा बघा. तिथे पडणारे खड्डे बघा. अशातच जर तिथे दारू विक्रीच्या घटना घडत असतील तर, सरकार यावर कदाचित असंही कारण देऊ शकतं की “आम्ही इथेनॉलसारखं पेट्रोलमध्ये दारू टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो. हे सरकार असं उत्तर देऊच शकतं. सरकारकडून काय उत्तर येतंय यापेक्षा, सरकारच्या राज्यात असं घडूच कसं शकतं, हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे.
हिंदुस्थानत पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि इथेनॉल मिश्रणाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पर्यावरण वगैरे गोष्टी एका बाजूला राहू द्या. नितीन गडकरीसाहेबांचा एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ते सांगत होते की, “जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण पूर्णपणे सुरू होईल, तेव्हा पेट्रोल 15 रुपये प्रति लिटर मिळेल. हा त्याचाच व्हिडीओ आहे. यावर जर प्रश्न विचारला तर आम्ही देशद्रोही. आता हाच व्हिडिओ जेव्हा त्यांना दाखवून प्रश्न विचारला जातो, तेव्हा ते म्हणतात की “मी असं बोललोच नाही.”
स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी इथेनॉलचा वापर
आज जगभरात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं आहे. मग आपल्याच देशात किमती का कमी होत नाहीत? उत्तर प्रदेशची निवडणूक आली की, तुम्ही किमती कमी करणार, गोव्याची निवडणूक आली की कमी करणार, देशाची सार्वत्रिक निवडणूक आली की कमी करणार? इथेनॉलच्या बाबतीत जागतिक तज्ज्ञ आणि इंडस्ट्री असं सांगत आहे की, ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ अजूनही पूर्णपणे वैज्ञानिक दृष्ट्या योग्य नाही (Unscientific) आहे आणि यामुळे गाड्यांच्या इंजिनचं किती नुकसान होतंय हे आपण पाहतोय. तरीही स्वतःचा धंदा वाढवण्यासाठी हे सक्तीने घुसवलं जात आहे. त्यापेक्षा आधी मुंबई-गोवा महामार्ग नीट करून दाखवा. गेल्या 12 वर्षांपासून या रस्त्याचं काम चालूच आहे. त्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये थोडं इथेनॉल टाकून ते खड्डे तरी बुजवून दाखवा, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले.
Comments are closed.