राजन पाटलांच्या अनगरमधील अनभिषिक्त सत्तेला पहिल्यांदाच आव्हान, उज्ज्वला थिटेंनी अखेर अर्ज भरलाच


Solapur Angar Nagarpanchayat Election: गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत अचानक प्रकाशझोतात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात राजन पाटील (Rajan Patil) यांची सत्ता आहे. इतकी वर्षे राजन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सातत्याने निवडून येत होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) रामराम ठोकत नगरपंचायत निवडणुकीपूर्वी भाजपचे कमळ हाती धरले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी भाजपने राजन पाटील यांना आपल्याकडे खेचले होते. यानंतर आता स्थानिक पातळीवर भाजप आणि अजितदादा गटात (Ajit Pawar NCP) संघर्ष सुरु झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासोबत अनगर ग्रामपंचायतीमध्येही राजन पाटील यांच्या कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. गेली अनेक वर्षे याठिकाणी राजन पाटील यांना आव्हान देणारा एकही चेहरा नव्हता. किंबहुना असा कोणताही उमेदवार उभाच राहणार नाही, अशी काळजी राजन पाटील यांनी घेतली होती. परंतु, आता राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांनी याठिकाणी उज्ज्वला थिटे यांच्या रुपाने नवा मोहरा रिंगणात उतरवला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार अर्ज भरता आला नव्हता. याबाबत बोलताना उज्ज्वला थिटे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.

राजन पाटील म्हणतात की, अनगर नगरपंचायतीमध्ये बाहेरचा उमेदवार लादला जात आहे. मी 2000 साली याठिकाणी लग्न होऊन आले. मी स्थानिक रहिवासी आहे. अनगरमध्ये माझं 1200 स्क्वेअर फुटांचं घर, 28 एकर जमीन आहे. मी येथील पोलीस पाटील घराण्याची सून आहे. राजन पाटील म्हणतात की, अनगरमध्ये कोणतीही दहशत नाही. मग एका विधवा महिलेला उमेदवारी अर्ज भरता येत नाही, यापेक्षा जास्त दहशत काय असू शकते, असा सवाल  उज्ज्वला थिटे यांनी विचारला.

अनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदा याठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली असती. पण मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी मागितली. त्यांनी मला एबी फॉर्म दिला. कारण इतकी वर्षे अनगरमध्ये कधीच कोणीही उमेदवारी अर्ज दाखल करत नव्हते. मलाही तिकडे जाऊन देत नव्हते. मागील तीन दिवसापासून मला उमेदवारी अर्ज दाखल करू दिलं जातं नव्हतं, आज मी तो अर्ज दाखल केला. अनगरमध्ये जर दहशत नसेल तर मला मागील तीन दिवसापासून फॉर्म का भरू दिलं जातं नव्हतं? रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले होते, गाड्या चेक करून उज्वला थिटे आणि त्यांचा मुलगा दिसला तर हल्ला करण्याचा डाव होता, अशी माहिती आम्हाला गुप्तहेरांकडून मिळाली होती. काल मी अर्ज भरण्यासाठी निघाले तेव्हा 10-12 गाड्या आमचा पाठलाग करत होत्या. मी एका ठिकाणी थांबणार होते. मात्र, मुलाने मला गाडी पोलीस स्टेशनला घ्यायला सांगितली. आम्ही काल पोलिसांकडे गेलो तेव्हा आम्हाला वेगळी वागणूक मिळाली. मात्र, आज पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केले. मला पोलिसांकडून संरक्षण दिले होते, त्यामुळे आज मी अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरु शकले. मला संरक्षण मिळालं तर संरक्षणात जाऊन प्रचार करेन. अन्यथा मी डिजिटल माध्यमानी प्रचार करेन. राजन पाटील म्हणतात की, मला नगरपंचायत सदस्य केलं असतं, पण मग त्यांनी स्वतःच्या सूनबाईऐवजी मला नगराध्यक्ष करायचं होतं ना?, असे उज्ज्वला थिटे यांनी म्हटले.

आणखी वाचा

त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला

आणखी वाचा

Comments are closed.