उज्ज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला?; 4 कारणं आली समोर, अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय घडलं?


Angar Nagarpanchayat Election 2025: सोलापुरातील अनगर नगरपंचायतीमध्ये (Angar Nagarpanchayat Election 2025) नगराध्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज बाद झाला आहे. उज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्यानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. दरम्यान काल याच अनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. उज्वला थिटे यांनी भाजपच्या राजन पाटील (Rajan Patil) यांच्यावर आरोप करत पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला. मात्र अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंनी आक्षेप घेतल्यानंतर अर्ज बाद करण्यात आला.

नेमकं काय घडलं? (Solapur Angar nagarpanchayat news)

अनगर नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. काल अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर भाजपचे सर्व 17 उमेदवार बिनविरोध झाल्याचंही सचिन मुळीक म्हणाले. दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयामध्ये जाणार असल्याचं उज्वला थिटेंनी सांगितलं आहे.

राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व- (Rajan Patil)

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन पाटील यांचे गेल्या अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व आहे. आता अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये (रुपांतर झाले असून याठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ती प्रतिष्ठेची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांची (Ajit Pawar NCP) साथ सोडून राजन पाटील यांनी भाजपचे कमळ हातात घेतले होते. त्यामुळे अनगर नगरपंचायत निवडणूक न लढवताच भाजपच्या पदरात पडेल, असा अंदाज होता. मात्र, याठिकाणी अजित पवारांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या अनगरमधील एकाधिकारशाहीला आव्हान दिले होते. मात्र, मंगळवारी रात्री नाट्यमयरित्या छाननीदरम्यान उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद ठरवला होता. यानंतर अनगरमध्ये राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


उज्ज्वला थिटेंचा अर्ज का बाद झाला? (Why was Ujjwala Thite application rejected?)

1. उज्ज्वला थिटेंनी प्रभाग क्रमांक 4 ऐवजी 5 असा चुकीचा लिहिला.

2. उज्ज्वला थिटेंनी मतदार यादीत अनुक्रमांक 217 ऐवजी 1042 असा चुकीचा नमूद केला

3. उज्ज्वला थिटेंनी वय नमूद केले पण पुरावा दिला नाही.

4. उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर सूचक म्हणून सहीच नव्हती.

उज्वला थिटे कोण? त्यांचा आणि राजन पाटील कुटुंबाचा वाद काय? (Rajan Patil vs Ujjawala Tithe)

उज्वला महादेव थिटे ह्या मुळच्या सोलापूर शहरातील रहिवासी, 2000 साली अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत लग्न झालं. उज्वला आणि महादेव याना जयवंत हा मुलगा झाला. 2020 साली महादेव थिटे यांचं कोरोना आणि कावीळ झाल्याने निधन झालं. जवळपास 23 वर्ष अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्वला थिटे यांच्या कुटुंबियांचे कोणतेही वाद नव्हते. मात्र 2023 साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे थिटे यांनी सांगितले. त्यांच्या दाव्यानुसार 21 फेब्रुवारी 2023 रोजी गावात शिवजयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं. यावरून वाद झाले आणि जयवंतला मारहाण झाली, प्रकरण पोलिसांत गेले आणि जयंवत थिटेवर ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा ही नोंद झाला. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्वला थिटे यांनी केला. मात्र त्यांच्या समर्थककडून सातत्याने त्रास देने सुरूच राहिल्याने 29 एप्रिल 2023 रोजी  त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे वाद आणखीच चिघळला, घरावर दगडफेक होऊ लागली आणि जीवितास धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा दावा उज्वला थिटे यांनी केलाय.

कोण आहेत राजन पाटील? (Who Is Rajan Patil)

सोलापूर जिल्ह्यातील अनगरचे रहिवासी, बाळराजे आणि विक्रांतराजे अशी दोन मुलं

मोहोळ मतदारसंघाचे माजी आमदार, मोहोळ तालुक्यावर वर्चस्व

1995, 1999 आणि 2004 अशा तीन मोहोळचे वेळा आमदार

शरद पवार आणि नंतर अजित पवारांचे विश्वासू होते

1980 पासून राजकारणात, अनगर ग्रा.पंचायत बिनविरोध काढतात

यंदा प्रथमच ग्रा.पंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाल्यानंतर अनगरमध्ये निवडणूक

अनगर नगर पंचायतीच्या 17 पैकी 16 जागा बिनविरोध काढल्या

आज अनगरच्या नगराध्यक्षपदाचीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

2024 मध्ये अजित पवारांकडून राजन पाटलांना सहकार परिषदेचं अध्यक्षपद

गेल्याच महिन्यात अजित पवारांची साथ सोडून भाजपात दाखल

राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांसोबत राजन पाटलांचा उभा दावा

‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच तुमच्याएवढी मोठी बाळं असतात’ या वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत होते.

संबंधित बातमी:

Rajan Patil & Amol Mitkari: ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांना मस्ती दाखवता, योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ; अमोल मिटकरींची राजन पाटलांना वॉर्निंग

आणखी वाचा

Comments are closed.