अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या शहराध्यक्षाला मारहाण, सुप्रिया सुळेंचा संताप


पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेगाने सुरु असून काही ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणुकी झालेल्या राड्यानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीतही वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे बारामती (Baramati) नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळाच्या चिन्हावर देण्यात आल्याने येथील राजकीय नाट्य संपुष्टात आले आहे. मात्र, बारामतीमधील माळेगाव बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीत वाद झाल्याचं समोर आलं आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाच्या शहराध्यालाच मारहाण करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.

बारामतीसाठी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता. अखेर तो सस्पेन्स दूर झाला असून सचिन सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याशिवाय यापूर्वी सचिन सातव हे बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक देखील राहिले आहेत. दरम्यान,माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण झालेली आहे.

सुप्रिया सुळेंकडून ट्विट करुन संताप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव बु.नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीतीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरीकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरीकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्ल्याचा निषेध करतो, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माळेगाव हल्ल्याबाबत आपला संताप व्यक्त केला. तसेच, माझी शासनाला विनंती आहे की, कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.

दरम्यान, नितीन तावरे यांना ही मारहाण का झाली हे अद्याप समजू शकलो नसलं तरी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ, अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे. मात्र, निवडणुकांच्या अनुषंगानेच राजकारणातून ही मारहाण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.