नाशिक डोंगराळे अत्याचार प्रकरण! पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत, आदिती तटकरेंची माहिती
नाशिक मालेगाव क्राईम न्यूज: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस (Malegaon Crime News) आली आहे. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीसांनी विजय खैरनार याला ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर माहाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचाराची गंभीर दखल घेत कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक हानी अपरिमित असून, त्यांना तात्काळ आधार मिळण्यासाठी शासनामार्फत आवश्यक पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून 10 लाख रुपयांची तात्काळ मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभा
घटनेची माहिती मिळताच पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी प्रशासनास दिले होते. त्या सूचनेनुसार संबंधित कुटुंबाला रु. 10 लाख रुपयांची मदत नियम व शासननिर्देशांनुसार मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे. या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे पीडित कुटुंबावर ओढवणारी वेदना आणि मानसिक आघात अमाप असतो. मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापी, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.
यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या भयंकर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने मूक मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला लासलगाव येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा काढत सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी आरोपीवर तातडीने फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरातील कठोर अशी फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी महिलांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Malegaon Crime News: मालेगावमधील तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच…, अंगावर काटा आणणारी घटना, महाराष्ट्र हादरला
आणखी वाचा
Comments are closed.