टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; रा


कोल्हापूर टीईटी पेपरफुटी राज्यभरात शनिवारी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच शिक्षकांसह एकूण 18 जणांना अटक करण्यात आली असून या टोळीचा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यालाही पोलिसांनी (Police) जेरबंद केले आहे.

या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात (Murgud Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टीईटी परीक्षा राज्यातील शिक्षक भरतीसाठी पहिली आणि अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते. मात्र, हीच परीक्षा फोडून लाखो रुपयांची कमाई करणारी टोळी कोल्हापूरमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Kolhapur TET Paper Leak: पाच शिक्षकांचाही समावेश

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील एका फर्निचर मॉलवर छापा टाकला. येथे टीईटी परीक्षेचा छायांकित पेपर विद्यार्थ्यांना तीन लाख रुपयांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कारवाईदरम्यान सुरुवातीला नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात या रॅकेटचा व्याप वाढत जाऊन अटक केलेल्यांची संख्या 18 वर पोहोचली. अटक केलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शिक्षकांचाही समावेश असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे शिक्षण विभागानेही संबंधित शिक्षकांची माहिती मागवून पुढील कारवाईची तयारी सुरू केली आहे.

Kolhapur TET Paper Leak: प्रकरणाची व्याप्ती राज्यभर?

राज्यात लाखो उमेदवार शनिवारी टीईटी परीक्षा देत होते. अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत सुरू असताना कोल्हापूरमध्ये मात्र पेपर फुटवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच शिक्षण विभागासह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काही परीक्षार्थी शिक्षक असून त्यांचा या रॅकेटशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी सर्वजण कागल आणि राधानगरी तालुक्यातील असून आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रभर तपास सुरू ठेवला असून रॅकेटची व्याप्ती राज्यभर पसरली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ

Kolhapur : तामगावचा रस्ता विमानतळ प्रशासनाने अडवला, ग्रामस्थांचा संयम सुटला अन् आंदोलनाचा उद्रेक

आणखी वाचा

Comments are closed.