नाशिकचा पालकमंत्री का नेमला जात नाही? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल, तपोवनातील झाडांच्या कत्तलीवर
उद्धव ठाकरे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची (Nashik Guardian Minister) घोषणा स्थगित करण्यात आली. यानंतर अद्याप महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर निशाणा साधलाय. तर नाशिकमध्ये (Nashik) 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Kumbh Mela 2027) मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यामुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा व्हायला पाहिजे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून कुंभमेळा होत आहे. गेल्यावेळी देखील तिथे कुंभमेळा झाला होता. तिथे येणारे हजारो-लाखो साधू संत आणि भाविकांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी सुविधा पुरवण्याचे काम हे सरकारचे आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडले, चेंगराचेंगरीमध्ये किती भाविक भाविकांचा जीव गेला? त्याचा नेमका आकडा अजून आलेला नाही. भाविकांना सोयी सुविधा देण्याचे काम सरकारचे असल्याने त्यात पारदर्शकपणा असला पाहिजे. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाही हे एक कोड आहे. त्या कोड्याचे उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चात आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
Uddhav Thackeray: तपोवनाने आपल्यापेक्षाही जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू ग्राम होणार आहे. ते नेमके मागच्या वेळेस कुठे झाले होते, याची माहिती आपण मिळवू शकतो. पण, यावेळी तपोवन नष्ट करण्यात येणार आहे. तपोवन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण हे काही काळ तेथे वास्तव्यास होते, अशी मान्यता आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्यापैकी तपोवन ही एक जागा आहे. तिथे जवळपास 60 वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. त्यातली अनेक औषधी वनस्पती आहेत. ही झाडे सगळीच शेकडो किंवा हजारो वर्षांची नाहीत, झाडे सुद्धा रिजनरेट होत असतात. अनेक वर्षांपासून तिथे निसर्गाचे चक्र सुरू आहे. या तपोवनाने आपल्यापेक्षाही जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील.
Uddhav Thackeray: साधूग्राम करण्याला आमचा विरोध नाही पण…
मुख्य म्हणजे तपोवनात जे साधूग्राम करण्यात येणार आहे. साधूग्राम करण्याला आमचा विरोध नाही. पण ते तपोवनात करण्यात येणार आहे, त्याला आमचा आक्षेप आहे. कारण हे झाडे कापली जाणार आहेत. तिकडे साधूंची व्यवस्था करणार आहात पण त्यानंतर काय होईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर पुन्हा तिथे झाडे लावणार असाल तर गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेत साधूग्राम का करत नाहीत? गिरीश महाजन म्हणाले, एक झाड कापलं तर दहा झाडं लावू. इतकी जागा असेल तर तिकडेच साधूग्राम का करत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.