व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर घटले, घरगुतीच्या वापराच्या गॅस सिलेंडरच्या दराचं काय?


नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक नियम बदलले आहेत. एलपीजी गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला जाहीर केले जातात. त्यामुळं एलपीजी ग्राहक सिलेंडरचे दर वाढतात की कमी होतात याकडे लक्ष ठेवून असतात. 1 डिसेंबर 2025 पासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर नव्यानं जाहीर करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात कपात जाहीर केली आहे. दिल्ली आणि कोलकाता येथे सिलेंडरचे दर 10 रुपयांनी कमी झाले आहेत. तर, मुंबई आणि चेन्नईत गॅस सिलेंडरचे दर 11 रुपयांनी कमी झाले आहेत. तर, घरगुती वापराच्या 14 किलोच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Price Cut : एलपीजीच्या दरात कपात

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाईट नुसार 1 डिसेंबरपासून 19 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 1590 रुपयांऐवजी 1580 रुपये झाले आहेत. कोलकाता येथे 1694 रुपयांवरुन दर 1684 रुपयांवर आले आहेत. मुंबईतील व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 1542 रुपयांवरुन 1531 रुपयांवर आले आहेत. तर, चेन्नईत 19 किलो गॅस सिलेंडरचा दर 1750 रुपयांवरुन 1739 रुपयांवर आले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात देखील व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. सलग दुसऱ्या महिन्यात दरात कपात करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरला 19 किलोच्या सिलेंडरचे दिल्लीतील दर 1595.50 रुपयांवरुन 1590 रुपयांवर आले होते. तर, कोलकाता येथे 1700.50 रुपयांवरुन दर 1694 रुपयांवर पोहोचला होता. मुंबईतील तर 1547 रुपयांवरुन 1542 रुपयांवर आला होता. चेन्नईत व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर 1754.50 रुपयांवरुन 1750 रुपयांवर आले होते.

बिहारच्या पाटणा येथे 14 किलोच्या गॅस सिलेंडरचा दर 951 रुपये तर व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1843.50 रुपये आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचा दर 1703 रुपये तर घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा दर 890.50 रुपये इतका आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरचा दर 1607.50 रुपये इतका आहे. तर, घरगुती वापराच्या 14 किलोच्या सिलेंडरचा दर 858.50 रुपये इतका आहे.

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर जैसे थे

गेल्या काही महिन्यांपासून तेल कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले जात आहेत. काही वेळा दरात वाढ केली जाते तर काही वेळा दरात कपात केली जाते. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर एप्रिल 2025 पासून बदलेले नाहीत. 14 किलोच्या सिलेंडरचा दिल्लीतील दर 853 रुपये, कोलकाता येथे 879 रुपये, मुंबईत 852 आणि चेन्नईत 868 रुपये इतका आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.