पार्थ पवारांवर कारवाई कधी? किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार? पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी अंबादा
पार्थ पवार पुणे जमीन घोटाळा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक (कुलमुखत्यारधार) शीतल तेजवानीला (Sheetal Tejwani) पुणे पोलिसांच्या (Pune Police) आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. तपासादरम्यान या व्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ‘अमेडिया’ कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना देखील नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चार सवाल विचारत राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.
1. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
2. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
3. अमेडिया कंपनीत केवळ 1 टक्का भागधारक दिग्विजय हा 99 टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
4. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…— अंबादास दानवे (@iambadasdanve) ४ डिसेंबर २०२५
Parth Pawar Pune Land Scam: नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील मुंढवा येथील 1800 कोटींच्या जमीन खरेदीसंदर्भातील प्रकरणात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर आरोप करण्यात आला होता की, अमेडिया कंपनीने ती जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतली आणि स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजले. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टँप ड्युटी माफ केली होती आणि हा व्यवहार फक्त 27 दिवसांत पूर्ण झाला. माध्यमांमध्ये ही माहिती आल्यावर उपमुख्यमंत्री आणि पार्थ पवारांचे वडील अजित पवार यांनी संबंधित व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली होती.
जमिनीवरील पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानीकडे होती. पोलिसांच्या तपासानुसार, शीतल तेजवानीने पॉवर ऑफ अॅटर्नीचा गैरवापर करून शासकीय जमीन खासगी कंपनीच्या नावावर केली. आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला दोन वेळा चौकशीसाठी बोलावले, आणि त्यांची चौकशीही झाली होती. तपासात असे समोर आले की, शीतल तेजवानी पोलिसांकडून मागितलेली ओरिजनल कागदपत्रे सादर करत नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की, शीतल तेजवानीने शासनाची फसवणूक केली आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून पॉवर ऑफ अॅटर्नी तयार केली. यामुळे शासकीय जमीन खासगी कंपनीकडे विकली गेली. शीतल तेजवानीची दोन वेळा चौकशी झाली होती, त्यापैकी एका दिवशी चौकशी साडेचार तास चालली. सखोल तपासानंतर आता शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप पार्थ पवारांवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.