पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस पंतप्रधान होणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या तिसऱ्या टर्ममधील कामकाजाला एक वर्ष झालं आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री (मुख्यमंत्री) आज नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, मागच्यावर्षी आजच्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि 232 जागा आम्हाला मिळाल्या, या एक वर्षात महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले. दरम्यान, यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (पृथ्वीराज चव्हाण) यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं होतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा दाखल देत लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल, असे त्यांनी म्हटले होते. चव्हाण यांच्या या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून 2019 ला देखील मोदीच पंतप्रधान असतील, असे त्यांनी म्हटले.

मोदीचं आरोग्य उत्तम, 40 वर्षाच्या व्यक्तीलाही लाजवेल

पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात, एक लक्षात ठेवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत. देशांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, असे कोणीही करू शकत नाही. मोदींचे आरोग्य उत्तम आहे, 40 वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशाप्रकारचे आहे. त्यामुळे, 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

एक वर्षाचा काळ समाधानी, अजून काम बाकी

आम्ही विकासाची कामे आणि लोकयोजना यामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा योजना असेल, त्यातच आज आम्ही विश्वविक्रम केला आहे. एका महिन्यात 46,911 सौर पंप लावून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये गेलो आहे. देशात नऊ लाख पंप लागले असून, त्यातील सात लाख पंप महाराष्ट्राने लावले आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे आणि मोफत वीज मिळत आहे. कृषी संजीवनी वाहिनी योजना पुढच्या वर्षी पूर्ण करू, त्यामुळे महाराष्ट्र पहिलं राज्य असेल जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मला झोप या करिता येत नाही कारण हे काम करायचे राहिले ते काम करायचे राहिले आहे. एक वर्षाचा काळ खूप मोठा काळ होत नाही, एक उत्सुकता आहे आणि भावना आहे की अनेक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या करू, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटले.

हेही वाचा

बाप रे… पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार

आणखी वाचा

Comments are closed.