पाच बाय पाचच्या खड्ड्यात वड-पिंपळाची झाडं लावणार का, डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन कॉम्प्यू
गिरीश महाजन: “पाच बाय पाचच्या खड्ड्यात वड-पिंपळाची झाडं लावणार का? डोकं ठिकाणावर आहे का?” कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा हा संतापाचा सवाल सध्या नाशिकच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वृक्षलागवडीसाठी खोदण्यात आलेल्या चुकीच्या खड्ड्यांवरून महाजन यांनी नाशिक महापालिकेच्या कॉम्प्युटर सायन्स शिकलेल्या कंत्राटदाराला अक्षरशः फैलावर घेतले.
तपोवन परिसरातील प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1800 झाडांची तोड होण्याची शक्यता वर्तवली जात असताना शहरात तीव्र विरोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी राज्य सरकारने नाशिकमध्ये 15 हजार देशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेसाठी दक्षिण भारतातील राजमुद्री येथून वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा यांसारखी सुमारे 15 फूट उंचीची झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये आणली जात आहेत. स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी राजमुद्री येथे जाऊन या झाडांची निवड केली होती.
Girish Mahajan: पाच बाय पाचच्या खड्ड्यात वड-पिंपळाची झाडं लावणार का?
मात्र प्रत्यक्षात वृक्षलागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे पाहून मंत्री महाजन संतापले. केवळ पाच बाय पाच फूट आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये वड-पिंपळासारखी मोठी देशी झाडे लावण्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना थेट फोनवर जाब विचारला. गिरीश महाजन म्हणाले की, डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? कॉम्प्युटर सायन्स करून झाडे लावायला कशाला आले इथे? कोणी ठेवले आहे तुम्हाला? तुम्ही पाच बाय पाचवर वडाचे आणि पिंपळाचे झाड लावत आहात का? मग इथे काय लावत आहात? झेंडूचे फुले लावत आहात का? देशी झाडे लावले तरी लिंबाचे झाड पाच बाय पाचवर येणार आहेत का? आपण करतोय काय हे आपल्याला कळत आहे का? मी आलो नसतो तर नुसतं नावाला झाड लावून टाका आणि लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या असत्या. तुम्हाला कोण विचारणार आहे? तेराशे किलोमीटर वरून आम्ही झाडे इथ आणतोय ते याच्यासाठी आणतोय का? असे ताशेरे त्यांनी ओढले.
Nashik NMC: नाशिक महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
दरम्यान, या घटनेमुळे नाशिक महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आधीच तपोवन परिसरातील 220 कोटींचा प्रदर्शन केंद्र प्रकल्प पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला, फाशीच्या डोंगरावर लावलेल्या झाडांची दुरवस्था, साधुग्रामसाठी चुकीच्या नोटिसा आणि रामटेकडीतील वृक्षतोड यामुळे महापालिका गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. गिरीश महाजन यांच्या या ताशेरेबाजीमुळे वृक्षलागवड केवळ आकडे पूर्ण करण्यापुरती न करता शास्त्रीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आता मंत्री महाजनांच्या संतप्त भूमिकेनंतर महापालिका प्रशासन सुधारणा करणार का, की हा प्रकार केवळ तात्पुरता गाजावाजा ठरणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.