नाशिकमध्ये सेमिफायनलच्या टप्प्यात भाजपने ‘कॅप्टन’ बदलला; ढिकलेंना तडकाफडकी हटवून फरांदेंची नियु

नाशिकचे राजकारण: आगामी महापालिका निवडणुकांच्या (Nashik NMC Election) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) रणसंग्रामाची तयारी जोरात सुरू असतानाच, नाशिक भाजपमध्ये मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी नाशिक महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांना हटवत, पक्षाने नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. सेमिफायनलच्या टप्प्यात भाजपने अचानक ‘कॅप्टन’ बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक महापालिकेत सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा दिला असून, त्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच भाजपने नाशिकचा प्रभारी म्हणून कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर महापालिका निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल ढिकले यांची जबाबदारी देण्यात आली होती.

Rahul Dhikale: सीनिअर आमदारांना डावलून ढिकले यांना संधी

शहरातील ज्येष्ठ आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना डावलत ढिकले यांच्याकडे जबाबदारी दिल्याने, त्या काळात नाशिकच्या राजकारणात त्यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले होते. ढिकले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तब्बल 970 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून, मुलाखतींचा पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, अचानक नेतृत्व बदलल्याने भाजप कार्यकर्त्यांसह विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत.

Rahul Dhikale: ‘त्या’ वक्तव्यानंतर घडली उलथापालथ?

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एका उद्घाटन कार्यक्रमात आमदार राहुल ढिकले यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर जाहीरपणे टीका केली होती. “आजारी असतानाही माझ्या विरोधात काम करणाऱ्यांना, माझी रॅली अडवणाऱ्यांना अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही. ढाक लावून अस्मान दाखवलं नाही तर ढिकले नाही,” असा इशारा त्यांनी व्यासपीठावरून दिला होता. निवडणूक प्रमुखच जाहीरपणे इशारा देत असल्याने, या वक्तव्याचा पक्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा संदेश वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपने धक्कातंत्र केल्याची कुजबुज आता भाजपमध्ये सुरू आहे.

Devyani Pharande: फरांदे यांच्या हाती सूत्रे

दरम्यान, महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून देऊ,” असे फरांदे यांनी स्पष्ट केले. तर, पदावरून हटवण्यात आलेले आमदार राहुल ढिकले यांनीही संयमित प्रतिक्रिया देत, “भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार जी जबाबदारी दिली जाईल, ती पार पाडेन. आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली काम करेन,” असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

BMC Election 2026: भाजपने एकनाथ शिंदेंची ‘त्या’ 84 जागांची मागणी धुडकावून लावली; ठाकरेंशी थेट सामना झाल्यास पराभवाचा धोका, बैठकीत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.