बीडमध्ये क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात, पंकजा मुंडेंनाही धक्का; अजित पवारांनी गड राखला

बीड : राज्याचं लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील बीड नगरपालिकेतील (Beed Nagarpalika Election) क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात आली आहे. बीड नगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली असून प्रेमलता पारवे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. तर नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या योगेश क्षीरसागर (योगेश क्षीरसागर) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (संदीप क्षीरसागर) यांना लोकांनी नाकारल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयामागे मुस्लिम मतांचा निर्णायक कौल असल्याची चर्चा आहे.

बीड नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या क्षीरसागर घराण्याची सत्ता आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत गेले, तर योगेश क्षीरसागर हे ऐनवेळी भाजपमध्ये गेले. त्यांच्यामागे पंकजा मुंडे यांनी पूर्ण ताकद लावली. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी ही गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांनी भाजपच्या डॉ. ज्योती घुम्रे यांचा पराभव केला. तर शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या विजयामुळे क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.

बीड नगरपालिका निवडणुकीचा निकाल : बीडमधील पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी अजित पवार गट – 18

भाजप – 14

राष्ट्रवादी शरद पवार गट – 11

शिवसेना शिंदे गट – 3

शिवसेना ठाकरे गट – 1

एमआयएम – 2

काँग्रेस – 1

गेवराई निवडणुकीचा निकाल : गेवराईमध्ये विजयसिंह पंडितांना धक्का

बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रावादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडितांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगरपरिषदेतील पंधरा वर्षांची सत्ता कायम राखली. गेवराईत भाजपचा दणदणीत विजय झाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार निवडून आल्या. त्यानंतर गेवराईमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. हा जनतेचा विजय असून जनतेनं मला कौल दिला अशी प्रतिक्रिया गीता पवार यांनी दिली.

परळी निवडणुकीचा निकाल : परळीमध्ये मुंडे भावंडांची जादू

नगर परिषद निवडणुकीत मुंडे भाऊ-बहिणीची जादू पाहायला मिळाली. परळी नगर परिषद निवडणुकीत मुंडे भावंडांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकला. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. महायुतीच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी 15 हजार 662 मतांनी विजय मिळवला. या विजयानंतर आमदार धनंजय मुंडेंनी परळीकरांचे आभार मानले आहेत..

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.