CA कार्यालयात 7 हजार पगाराने काम, 22 व्या वर्षी उमेदवारी, भाजपाच्या तगड्या उमेदवाराला हरवलं, सर
Siddhi Vastre Mohol Nagarparishad Election Results 2025: मोहोळ नगरपरिषदेच्या (Mohol Nagarparishad Election Results 2025) राजकारणात इतिहास घडला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या अवघ्या 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे (Siddhi Vastre) हिने नगराध्यक्षपदाचा मान पटकावत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. सामान्य कुटुंबातून आलेली सिद्धी हिने एका महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज ही तरुणी थेट मोहोळ नगर परिषदेची प्रथम नागरिक ठरली आहे. सीएच्या कार्यालयात काम करणारी सिद्धी वस्त्रे हिने अत्यंत कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचत प्रभावी प्रचार केला.
शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना थेट भिडणारी भूमिका, तरुणाईशी साधलेला संवाद आणि साधेपणाची प्रतिमा यामुळे मतदारांनी तिला भरभरून पाठिंबा दिल्याचे दिसतंय. या निवडणुकीत सिद्धीने मोहोळ शहरात मोठी ताकद असलेल्या क्षीरसागर कुटुंबातील असलेल्या भाजपाच्या उमेदवार शितल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत निर्णायक विजय मिळवला. अवघ्या 22 व्या वर्षी नगराध्यक्षपदाची माळ गळ्यात पडल्याने सिद्धी वस्त्रे हिचं सर्वत्र कौतुक होत असून, मोहोळच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. (Siddhi Vastre Maharashtra Youngest Nagaradhyaksha)
सोलापूर जिल्हाच्या निकालाची वैशिष्ट्ये- (Nagarparishad Election Results 2025)
सोलापूर जिल्ह्यातील 12 नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. पहिल्यांदाच भाजपने 12 पैकी 12 ठिकाणी कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते. मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय अपेक्षित यश देऊ शकला नाही. 12 पैकी केवळ 4 नगरपालिकांवर भाजपला सत्ता मिळवता आली आहे. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांनी 6 ठिकाणी निवडणूक लढवून 3 ठिकाणी विजय मिळवला. काँग्रेस मात्र जिल्ह्यातून पूर्णपणे हद्दपार झाली असून एकाही नगराध्यक्षपदावर विजय मिळवता आलेला नाही.
अक्कलकोट तालुका-
अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा राखली. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट नगरपरिषदेत एकहाती सत्ता मिळवली. मैंदर्गी नगरपरिषदेत भाजपच्या अंजली बाजारमठ नगराध्यक्ष ठरल्या. विशेष म्हणजे 135 वर्षांपासून स्थानिक आघाडीची सत्ता असलेल्या मैंदर्गीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष निवडून आला. दूधनी नगरपरिषदेत नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी पुन्हा सत्ता मिळवली असून, त्यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे (शिंदे गट) नगराध्यक्ष झाले.
बार्शी-
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. बाजार समितीनंतर भाजपने बार्शी नगरपरिषदेतही कमळ फुलवले. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांना धक्का देत भाजपच्या तेजस्विनी कथले नगराध्यक्ष ठरल्या.
मोहोळ-
मोहोळ नगरपरिषदेत भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे यांनी केवळ 170 मतांच्या फरकाने नगराध्यक्षपद पटकावले. या ठिकाणी भाजपाविरोधी लढाईत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनेही शिवसेनेला पाठिंबा दिला. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत राज्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. भाजपाच्या सर्व उमेदवारांचा बिनविरोध विजय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला. उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने हा प्रकार चर्चेत आला. या निवडणुकीत शहाजी बापूंना एकटे पाडल्याचा मुद्दा पुढे आला आणि मिळालेल्या सहानुभूतीमुळे भाजपा आमदार बाबासाहेब देशमुख तसेच शेतकरी कामगार पक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे गटाला पराभव स्वीकारावा लागला.
अकलूज-
अकलूजमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र स्थानिक जनतेने पुन्हा एकदा मोहिते पाटील आणि शरद पवार गटाच्या बाजूने कौल दिला. तरीही अकलूजमध्ये पहिल्यांदाच भाजपच्या कमळावर चार नगरसेवक निवडून येणे हे भाजपसाठी महत्त्वाचे यश ठरले.
पंढरपूर–मंगळवेढा-
पंढरपूर आणि मंगळवेढा येथे दिवंगत आमदार भारत भालके यांनी स्थापन केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. मात्र नगरपालिकांमध्ये बहुमत भाजपकडे आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला भगीरथ भालके यांनी भाजप आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत घेतल्याची चर्चा आहे.
करमाळा आणि कुर्डूवाडी-
करमाळ्यात भाजप, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना धक्का देत नवख्या सावंत यांनी सत्ता मिळवली. कुर्डूवाडी नगरपालिकेत उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवत भगवा फडकवला.
एकूण चित्र काय?
सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपालिकांवर भाजप, 3 शिवसेना शिंदे गट, 3 स्थानिक आघाडी, 1 शिवसेना ठाकरे गट आणि 1 राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी झाला आहे. या निकालांनी आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील राजकारण अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.