शेअर बाजारात पहिल्याच दिवशी सेन्सेक्समध्ये 600 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी  4 लाख कोटी कमावले

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याचा पहिलाच दिवस तेजीचा राहिला. भारतीय रुपया भक्कम होणं आणि सकारात्मक जागतिक संकेतामुळं शेअर बाजारात तेजी कायम राहिली. सेन्सेक्समध्ये 638 अंकांची तेजी दिसून आली. आज एका दिवसात बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे.

Share Market Update : सेन्सेक्समध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल

बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स  85567.48 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 50 मध्ये देखील 206 अंकांची तेजी दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांक 26172.40 अंकांवर बंद झाला. बीएसईवर मिडकॅप निर्देशांकात 0.86 टक्क्यांची वाढ झाली. स्मॉलकॅप निर्देशांक 1.12 टक्क्यांनी वाढला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य एका दिवसात 471  लाख कोटी रुपयांवरुन 475 लाख कोटी रुपये झालं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी एका दिवसात 4 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बीएसई सेन्सेक्सवर लिस्ट असलेल्या टॉप 10 कंपन्यांपैकी इन्फोसिस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक यांच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. तर, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक आणि एल अँड टी या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली आहे.

शेअर बाजारीतल तेजीची कारणं?

भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु होण्याचं कारण रुपया मजबूत होणं, विदेशातून नव्यानं भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक  होणं हे आहे. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर पोहोचला होता, तो भक्कम होऊन आता 89.70 रुपयांवर आला आहे. आंतरराष्ट्रीय संकेत सकारात्मक असल्यानं आणि अमेरिकेच्या फेड रिझर्व्हकडून पुढील वर्षी देखील व्याज दर कपात केली जाण्याची शक्यता असल्यानं बाजार मजबूत झाला. डिसेंबरमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 22814 कोटी रुपये काढून घेतले होते. आज त्यांनी पुन्हा गुंतवणूक करत खरेदी केली.

निफ्टी 50 वर 38 स्टॉक तेजीसह बंद झाले. यात ट्रेंट, श्रीराम फायनान्स, विप्रो या स्टॉकचा समावेश आहे. तर, एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, टाटा कंझ्युमर, स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टॉकमध्ये घसरण झाली.

दरम्यान, आज आयटी कंपन्या आणि स्टील कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळाली. सुरक्षित पर्याय म्हणून लोक अजूनही सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.