लेडिज डब्यात शिरल्याने महिलांनी हटकले, मनोरुग्णाने विद्यार्थिनीला थेट लोकल बाहेर फेकलं

मुंबई : राज्यकर्ते कितीही चांगलं चित्र रंगवत असले तरी मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित करणारी संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून, एका विकृताने तरुणीला ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. लेडीज डब्यात शिरलेल्या एका माथेफिरुला हटकणं विद्यार्थिनीच्या अंगलट आलं आणि त्याने थेट तिला बाहेरच फेकलं.

मुंबई लोकल घटना : नेमकं काय घडलं?

सोमवारी नेहमीप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गाच्या पनवेल स्थानकात सीएसएमटीकडे जाणारी लोकल थांबली. नेहमीप्रमाणे धक्काबुक्की करत प्रवासी लोकलमध्ये शिरले. १८ वर्षांची श्वेता तिच्या मैत्रीणींसोबत कॉलेजला निघाली होती. महिलांचा डबा खच्चून भरल्यानं तिला दरवाज्यातच उभं राहावं लागलं. तेवढ्यात महिलांच्या डब्यात अचानक एक पुरुष चढला आणि महिलांनी एकच आरडाओरडा सुरु केला.

डब्यातील महिला आणि तो पुरुष यांच्यात जोरदार बाचाबाची सुरु झाली. हा गोंधळ सुरु असताना त्या विक्षिप्त माणसानं दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या श्वेताला थेट लोकलबाहेर ढकलून दिलं. पनवेलमधून लोकल खांदेश्वरच्या दिशेनं जात असताना प्लॅटफॉर्मच्या बाहेर ती मुलगी जोरदार आदळली.

पनवेल ते सीएसएमटी लोकल बातम्या : तो मनोरुग्ण निघाला

लोकलमधील महिलांनी लगेच आपत्कालीन चेन खेचली. लोकल खांदेश्वर स्थानकात पोहचताच जीआरपी पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज शेखच्या मुसक्या आवळल्या. मात्र श्वेताच्या डोक्याला, कंबरेला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. हे अमानुष कृत्य करणारा तो माणूस मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

खरंतर मुंबईच्या लोकलमध्ये हा प्रकार नवीन नाही. अचानक दारुडे, विविध वस्तू विकणारे विक्रेते, मनोरुग्ण महिलांच्या डब्यात शिरतात. महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस कर्मचारी असतात. मात्र, महिलांची छेड काढणं, त्यांच्या अंगाला स्पर्श करणं, विकृत चाळे करणं असे प्रकार आता दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु झालेत. त्यामुळे दिवसाही महिलांच्या डब्यात पोलीस तैनात ठेवण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे.

मुंबई लोकलमध्ये महिला सुरक्षा: महिलांची सुरक्षा महत्त्वाची

असे प्रकार घडले की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येतो. महिला कशा असुरक्षित आहेत याचा पाढा राजकारण्यांपासून प्रशासनाकडून वाचला जातो. मात्र, त्यावर कठोर उपाययोजना करणं आणि महिलांनी निर्धास्तपणे प्रवास करण्याजोगं वातावरण निर्माण करणं हीच प्राथमिकता आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.