पवारांच्या बारामतीत शरद पवारांच्या उमेदवारापेक्षा बसपाच्या काळुराम चौधरींना जास्त मतं , संघमित्
Nagarparishad Election Result 2025 Baramati: नुकत्याच पार पडलेल्या राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीने एकहाती बाजी मारत मविआला पूर्णपणे नामोहरम केले आहे. नगरपरिषदेच्या या निकालांमध्ये बारामतीचा निकाल (Baramati Election) अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. आजपर्यंत बारामती म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) या रुढ समीकरणाला या निकालांनी पुन्हा एकदा सुरुंग लावला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती नगरपरिषदेतील 41 पैकी 35 जागांवर विजय मिळवला आहे. उर्वरित सहा विजयी उमेदवारांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या संघमित्रा काळूराम चौधरी यांचा समावेश आहे. काळूराम चौधरी (Kaluram Chaudhari) हे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र महासचिव आहेत. त्यांनी बारामती नगरपरिषदेच्या (Nagarparishad Election Result 2025) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत काळूराम चौधरी यांना 6652 मते पडली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला 5053 मते पडली. नगराध्यक्षपदाच्या लढतीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांची मुलगी संघमित्रा (Sanghmitra Chaudhari) ही या निवडणुकीत विजयी झाली आहे. बारामती नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 अ मधून काळूराम चौधरी यांची लेक संघमित्रा चौधरी यांनी विजयाचा गुलाल उधळला.
काळूराम चौधरी हे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पवारांच्या बारामतीत थेट पवारांनाच अंगावर घेण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा की नगरपालिका पवार कुटुंबावर ओरखडे काढण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. विशेष म्हणजे चळवळीच्या माध्यमातून राजकारण करताना त्यांनी कधीही पक्ष बदललेला नाही. अखेर बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर त्यांची लेक संघमित्रा चौधरी यांनी वयाच्या 22 व्या वर्षी बारामती नगर परिषदेत पाऊल ठेवले आहे.
काळूराम चौधरी आणि त्यांची लेक संघमित्रा चौधरी दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे मुद्द्याचं बोलून पवार कुटुंबाला ते नेहमीच अडचणीत आणतात. आत्ताही बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत ‘ज्यांना राहायला घर नाही, त्यांना मी वन बीएचके घर देईन’, अशी घोषणा करून ते महाराष्ट्रात चर्चेत आले होते. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी संघमित्रा आणि काळूराम चौधरी यांच्यासाठी प्रचार केला होता. बारामतीतील वंचित वर्गांनी आणि बहुजन वर्गाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना मतदान केले. अगदी शरद पवार यांच्या पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारापेक्षा काळूराम चौधरी यांना जास्त मते पडली आहेत.
आतापर्यंत बहुजन समाज पक्षाची ताकद बारामती फारशी नव्हती. परंतु यंदा पवारांचे कट्टर विरोधक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बारामतीत दोन ते तीन वेळेस सभा घेऊन काळुराम चौधरी यांचा प्रचार केला. या प्रचाराच्या माध्यमातून पवार कुटुंबावर त्यांनी शेलक्या शब्दात टीका केली होती. बारामतीतील पवार विरोधी मतदान आपल्याकडे खेचण्यात काळुराम चौधरी यांना मोठं यश मिळालं. निवडणूक काळात ‘लक्ष्मी दर्शन’ करून मते मिळवता येतात, असे गृहीतक आहे. परंतु दलित आणि वंचित समाजाने या गृहीतकाला छेद दिला. चौधरी यांच्या लेकीने नगरपरिषदेत एन्ट्री करू नये यासाठी अजित पवार यांच्या पक्षाने पुरेपूर प्रयत्न केला होता. तन-मन-धनाने काम केले. परंतु चौधरी पिता-लेक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पुरून उरले. त्यामुळे या विजयाची राज्यभरात चर्चा होत आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.