‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं!’ सतेज पाटील नवीन टॅगलाईनसह महापालिकेच्या रिंगणात

कोल्हापूर : रांगड्या मातीच्या कोल्हापूरने महाराष्ट्राला या आधी अनेक नवीन शब्द आणि प्रभावी टॅगलाईन दिल्या आहेत. 'आमचं ठरलंय' ही गाजलेली टॅगलाईन तुम्हाला आठवत असेलच. यामध्ये आता आणखी एका टॅगलाईनची भर पडली आहे. 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं!' ही महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची टॅगलाईन असणार आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पुढाकाराने आणि खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या उपस्थितीत ही नवीन टॅगलाईन जाहीर करण्यात आली.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने दुसरा गिअर टाकला आणि आपल्या प्रचाराची टॅगलाईन प्रसिद्ध केली. 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं!' ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस आता महापालिका निवडणुकीला सामोरी जाणार आहे. यावेळी कोल्हापुरात सुधारणा, विकासकामं करण्यासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागवणार असल्याचं सतेज पाटलांनी सांगितलं. त्याला प्रतिसाद येणं सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच खासदार शाहू महाराजांनी तर पत्रकारांनाही सूचना पाठवण्याचं आवाहन केलं.

कोल्हापूर काँग्रेसची टॅगलाइन : पूर्ण शहरभर होर्डिंग्ज

काँग्रेसच्या याच टॅगलाईनचे भले मोठे होर्डिंग्ज कोल्हापूर शहरात प्रवेश केल्यापासून ते शहरातील मुख्य चौकांपर्यंत सगळीकडे पाहायला मिळत आहेत. या होर्डिंग्जवर कोणत्याही नेत्याचा फोटो नाही किंवा कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही हे विशेष.

काँग्रेसमध्ये हे सगळं सुरु असताना आम आदमी पक्ष मात्र इंडिया आघाडीतून बाहेर पडला. काँग्रेसने अतिशय कमी जागांचा प्रस्ताव दिल्याने आम आदमी पक्षाने स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

अवघ्या वर्षभरापूर्वीच उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघावरुन काँग्रेसमध्ये मोठे मतभेद महाराष्ट्राला पाहायला मिळाले होते. मालोजीराजे, शाहू छत्रपती यांनी मधुरिमाराजेंना माघार घ्यायला लावल्यावर सतेज पाटलांचा झालेला तिळपापड, त्यावेळचं दृश्य, आणि 'दम नव्हता तर लढायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद' हे सतेज पाटलांचे संतापातून बाहेर आलेले शब्दही राज्यभर गाजले होते.

आता मात्र हे सगळं विसरुन राजे आणि सतेज पाटील एकत्र आल्याचं चित्र आहे. त्यातूनच कोल्हापूर 'कसं, तुम्ही म्हणशीला तस्सं..' या टॅगलाईनचा जन्म झाला.

याआधी कोल्हापूरने महाराष्ट्राला अनेक नवीन शब्द आणि टॅगलाईन दिल्या आहेत. 'आमचं ठरलंय' ही अशीच गाजलेली टॅगलाईन त्यापैकीच एक. यामध्ये आता नव्याने आणखी एका टॅगलाईनची भर पडली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.