लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याच

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास  31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींना ई- केवायसी करण्याठी आता केवळ आठवड्याचा वेळ शिल्लक आहे. या कालावधीत सर्व लाडक्या बहिणींनी ई- केवायसी करुन घेणं अपेक्षित आहे. एकीकडे ई-केवायसीसाठी आठवड्याचा वेळ शिल्लक असतानाच दुसरीकडे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना ई-केवायसीसाठी शेवटचा आठवडा

महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतील अटीनुसार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महिला व बाल विकास विभागानं या योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा म्हणून ई- केवायसी प्रक्रिया सुरु केली होती. पहिल्यांदा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुदतवाढ देत  31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण 3-4 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं होतं. आता डिसेंबर महिन्याचा शेवटचा सुरु झालेला असताना लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार अशी प्रतीक्षा आहे.

ई-केवायसी दुरुस्तीची एक संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई- केवायसी करत असताना काही चूक झाली असेल. तर, चूक दुरुस्त करण्याची एक संधी लाडक्या बहिणींना देण्यात आली आहे. त्यानुसार लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत लाडकी बहीण ई केवायसी दुरुस्तीची संधी देखील देण्यात आली आहे.

एकल महिलांनी ई केवायसी कशी करायची?

राज्यातील ज्या लाडक्या बहिणींच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झाले असेल, घटस्फोट झाला असेल अशा महिलांनी पोर्टलवर स्वत: ची ईकेवायसी करुन घ्यावी. यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या निधनाचे प्रमाणपत्र, घटस्फोटाची कागदपत्रं याची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यायची आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांना मिळालेली आहे.  महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी 10 डिसेंबरला विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार 1 कोटी 74 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या ई- केवायसी करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.