पुणे महानगरपालिका निवडणूक: प्रभाग 32 मध्ये ‘भिसे’ कुटुंब उमेदवारीच्या केंद्रस्थानी; पक्षांकडून
पुणे : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. यातच प्रभाग क्रमांक 32 (वारजे-माळवाडी क्षेत्र) विशेष चर्चेत आला असून, येथे ‘भिसे’ कुटुंबाभोवती निवडणुकीचे चक्र फिरताना दिसत आहे.
भाजपमध्ये इनकमिंग आणि तिकिटांची कात्री
प्रभाग 32 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. निष्ठावंत आणि नवीन प्रवेश केलेले नेते यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू झाल्याने अनेक इच्छुतांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून प्रियांका भिसे यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रियांका भिसे यांना इतर पक्षांकडूनही ऑफर
प्रियांका भिसे यांची प्रभागातील पकड आणि अलीकडच्या काळातील त्यांची सक्रियता पाहून इतर प्रमुख पक्षांनीही त्यांच्यावर डोळा ठेवला आहे. प्रभाग 32 मध्ये इतर पक्षांकडे अनुसूचित जाती प्रवर्गातून तोडीस तोड महिला उमेदवार नसल्याने, भिसे यांना प्रतिस्पर्धी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारीच्या ऑफर मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘तनिष्का भिसे’ प्रकरणाची सहानुभूती
काही काळापूर्वी झालेल्या ‘तनिष्का भिसे’ प्रकरणात प्रियांका भिसे यांनी व्यवस्थेविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका जनतेच्या पसंतीस उतरली होती. त्यांनी मांडलेले मुद्दे आणि सामान्यांसाठी दिलेला लढा यामुळे त्यांच्याबद्दल जनमानसात मोठी सहानुभूती आहे. हीच ‘व्होट बँक’ प्रियांका भिसे यांच्या विजयाचा मार्ग सुकर करू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.
आमदार तापकीर विरुद्ध सचिन दोडके वाद?
दुसरीकडे, आमदार भीमराव तापकीर यांचे कट्टर विरोधक सचिन दोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या प्रभागातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
दोडकेंच्या प्रवेशामुळे आमदार तापकीर पक्षात नाराज असल्याची चर्चा असून, याचा परिणाम उमेदवारी वाटपावर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकंदरीत, प्रभाग 32 मध्ये उमेदवारी कोणाला मिळते आणि प्रियांका भिसे नक्की कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आणखी वाचा
Comments are closed.