रेकॉर्डचा चुराडा! पहिल्याच दिवशी विजय हजारे ट्रॉफीचा इतिहास-भूगोल बदलला, रोहित, विराट, वैभव सूर

विजय हजारे ट्रॉफी 2025 पहिला दिवस 22 शतकांचा विक्रम : विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चा पहिला दिवस इतिहास बदलणारा ठरला. देशभरातील वेगवेगळ्या मैदानांवर खेळल्या गेलेल्या सामन्यांत गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले आणि एकामागोमाग एक विक्रम मोडले. अवघ्या एका दिवसात तब्बल 22 फलंदाजांनी शतक झळकावली, ज्यामुळे या प्रतिष्ठित घरगुती एकदिवसीय स्पर्धेतील जुना विक्रम मोडीत निघाला. याआधी एका दिवसात सर्वाधिक 19 शतके लागली होती, मात्र यंदा हा आकडा इतिहासजमा झाला. या ऐतिहासिक दिवशी विराट कोहली, रोहित शर्मा, ईशान किशन, वैभव सूर्यवंशी आणि देवदत्त पडिक्कल यांसारख्या दिग्गजांनी चमकदार खेळी केल्या.

विराट कोहलीची आठवणीत राहणारी पुनरागमनाची खेळी

तब्बल 15 वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीत पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने दिल्लीकडून आंध्र प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावले. विराटने 101 चेंडूत 131 धावांची दर्जेदार खेळी करताना क्लासिक कव्हर ड्राइव्ह आणि आक्रमक पुल शॉट्सचा नजराणा दिला. नितीश राणाने 77 तर प्रियंश आर्यने 74 धावांची मोलाची साथ दिली. परिणामी दिल्लीने 299 धावांचे लक्ष्य अवघ्या 37.4 षटकांत सहज पार केले. या शतकासह विराटने लिस्ट ‘A’ क्रिकेटमधील 16,000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावांत गाठत नवा विक्रम आपल्या नावावर केला.

रोहित शर्माचा ‘हिटमॅन’ अंदाज

मुंबईकडून खेळताना रोहित शर्माने सिक्कीमच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोहितने 94 चेंडूत 155 धावा करताना 18 चौकार आणि 9 षटकार ठोकले. मुंबईने 237 धावांचे लक्ष्य फक्त 30.3 षटकांत पूर्ण केले. बराच काळानंतर घरगुती एकदिवसीय क्रिकेट खेळणारा रोहित पूर्ण लयीत दिसत होता.

ईशान किशनचा तांडव

झारखंडकडून खेळताना ईशान किशनने कर्नाटकविरुद्ध अवघ्या 39 चेंडूत 125 धावांची वादळी खेळी केली. 7 चौकार आणि 14 षटकारांच्या जोरावर त्याने संघाची धावसंख्या 412 पर्यंत नेली. मात्र देवदत्त पडिक्कलच्या 147 धावांच्या दमदार खेळीमुळे कर्नाटकने हे मोठे लक्ष्य सहज गाठले.

बिहारचा ऐतिहासिक विश्वविक्रम

प्लेट गटात बिहारने अरुणाचल प्रदेशविरुद्ध क्रिकेट इतिहासच बदलून टाकला. बिहारने 6 बाद 574 धावा केल्या, जो लिस्ट ‘A’ क्रिकेटमधील नवा विश्वविक्रम ठरला. कर्णधार साकिबुल गनीने अवघ्या 32 चेंडूत शतक, तर केवळ 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने 84 चेंडूत 190 धावा ठोकत साऱ्यांना थक्क केले. आयुष लोहारुकानेही 116 धावांची खेळी केली. बिहारच्या डावात 49 चौकार आणि 38 षटकार ठोकले गेले.

युवा खेळाडूंची शतकी छाप

या मोठ्या नावांसोबतच अर्पित भटेवरा, रिकी भुई, यश दुबे, समर गज्जर, स्नेहल कौथंकर, शुभम खजुरिया, किशन लिंगदोह, अमन मोखडे, हिमांशू राणा, रवी सिंग, ध्रुव शौरी, फिरोजमन जोतिन, विष्णू विनोद आणि बिप्लब सामंत्रे यांसारख्या युवा खेळाडूंनीही शतक झळकावत पहिल्याच दिवशी इतिहास रचला.

स्वस्तिक सामल – दिवसाचा खरा हिरो

या सगळ्या झगमगाटातही दिवसाचा खरा नायक ठरला ओडिशाचा 25 वर्षीय फलंदाज स्वस्तिक सामल. सौराष्ट्रविरुद्ध त्याने 169 चेंडूत 212 धावांची अफलातून खेळी साकारली, ज्यात 21 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. ओडिशाकडून लिस्ट ‘A’ क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. संघाला विजय मिळवता आला नाही, पण सामलची खेळी त्याला चर्चेच्या केंद्रस्थानी घेऊन गेली.

वैभव सूर्यवंशीसह 22 वादळी शतकं, पाहा यादी

विराट कोहली, रोहित शर्मा, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन, वैभव सूर्यवंशी, साकिबुल गनी, आयुष लोहारुका, अर्पित भटेवरा, रिकी भुई, यश दुबे, समर गज्जर, स्नेहल कौथंकर, शुभम खजुरिया, किशन लिंगदोह, अमन मोखडे, हिमांशू राणा, रवी सिंग, ध्रुव शौरी, फिरोजमन जोतिन, विष्णू विनोद, बिप्लब सामंत्रे आणि स्वस्तिक सामल या 22 खेळाडूंनी शतकं ठोकली. विजय हजारे ट्रॉफीचा पहिला दिवस धावांचा महापूर, विक्रमांची बरसात आणि नव्या नायकांची ओळख करून देणारा ठरला.

हे ही वाचा –

Vijay Hazare Trophy : बीसीसीआयकडून ‘रो-को’चा व्हिडीओ पोस्ट, चाहते संतापले…, रोहित शर्मा अन् विराट कोहलीने शतक ठोकल्या नंतर काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.