पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक! अमोल कोल्हेंसह रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला

Pune Pimpri Chinchwad News : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे (Mahapalika Election)  बिगुल वाजलं आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची या निवडणुकांसाठी युतीची घोषणा झाली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या देखील युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीची देखील एकत्र निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक पार पडली आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार बैठकीला हजर होते. आज रात्रीच ते अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीची गुप्त बैठक पार पडली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे यांच्यात चर्चा झाली आहे. एक तास झालेल्या बैठकीत जागा वाटपावर बरीच घासाघीस झाली आहे. अजित पवारांच्या इच्छुक उमेदवारांच्या जागी शरद पवारांच्या इच्छुकांनींही दावा केला आहे. या ठिकाणी नेमके कोणाचे उमेदवार द्यायचे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घ्यायचं का? यावर बरीच खलबते रंगली आहेत.

अमोल कोल्हे आणि रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संवाद साधणार

दरम्यान, या बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी नो कमेंट्स म्हणत थेट पुणे गाठलं आहे. आता पुण्यात हे दोघे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत, अशी माहिती अजित पवार गटाकडून बैठकीत उपस्थित असलेल्या अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आघाडी होण्याची शक्यता

भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या देखील युतीसंदर्भात चर्चा सुरु आहे. दरम्यान, अशातच ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार गटाच्या प्रस्तावावर शरद पवार गटाचे देखील सकारात्मक उत्तर आले आहे. ठाण्यातील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांचा देखील राष्ट्रवादीच्या युतीला होकार आहे.

महत्वाच्या बातम्या:

पुण्यानंतर ठाणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर शरद पवार गट सकारात्मक

आणखी वाचा

Comments are closed.