कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेसोबत युती नकोच, झालीच तर महापौरपद हवं; भाजप कार्यकर्त्यांची भूमिका

ठाणे: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या युतीसाठी भाजप आणि शिवसेना समन्वयक समितीच्या बैठकीचा सिलसिलाही सुरु आहे. या ठिकाणी शिवसेनेसोबत युती नकोच, स्वबळावर लढू असा पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तर युती झालीच तर महापौरपदासह स्थायी समिती पद मिळावे अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे असं माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर, तीन वर्षे स्थायी समिती सभापती पदाची मागणी भाजपने केली आहे. आता त्यावर वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने स्वबळावर लढावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचं मत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केलं आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे युती जर झाली तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं नरेंद्र पवार म्हणाले.

Kalyan-Dombivli Election : युती झाली तर नुकसान, नरेंद्र पवारांचा दावा

नरेंद्र पवार म्हणाले की, युती केली तर भाजपचे नुकसान आहे. प्रत्येकाला ही निवडणूक लढवायची आहे . युती झाली तरी बंडखोर एकमेकांच्या जागा पडण्याचा प्रयत्न करतील. युती झाली तर कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळेल. त्यामुळे शिवसेनेसोबत युती होऊ नये यासाठी समन्वयक समिती प्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या आहेत.

शिवसेना-भाजपचा संघर्ष अंबरनाथ, बदलापूरमध्ये पाहायला मिळाला. तशा पद्धतीचा संघर्ष टाळायचा असेल तर प्रयत्न करायला हवा. विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद असल्याचा दावा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भामध्ये काही निर्णय झालेला नाही. कोअर कमिटीचा निर्णय झाल्यानंतर जागा वाटपाची यादी येणार आहे. त्यामुळे आता सध्या जागावाटपासंदर्भात कुठली चर्चा नाही. सोमवार-मंगळवारी फॉर्म भरले जातील. शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रत्येक पक्षाचे धोरण निश्चित होईल असं नरेंद्र पवार म्हणाले. भाजप शिवसेनेचा संघर्ष टाळण्याकरता युती होणे अपेक्षित आहे. मात्र कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर युती करु नये असं मत नरेंद्र पवार यांनी व्यक्त केलं.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर पाच वर्षे भाजपचा महापौर असला पाहिजे. गेल्या पंचवार्षिकला युतीमध्ये शिवसेनेने महापौरपद सोडले नाही. आमदार-खासदारांना काही मर्यादा असतात, त्यामुळे आपल्या पक्षाचा महापौर असणं गरजेचं आहे. केंद्राचे किंवा राज्य शासनाचे रखडलेले प्रोजेक्ट भाजपाचा महापौर सोडवू शकतो असा दावा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.