पिंपरीत 128 पैकी 125 जागा जिंकणार, अजितदादांना फक्त तीनच जागा मिळणार; भाजप आमदाराचा मोठा दावा

पुणे : एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) भाजपचा मोठा विजय होईल, भाजपला 128 पैकी 125 जागा मिळतील असा दावा आमदार शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी केला. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला फायदा होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, उर्वरित कोणत्या तीन जागा या अजितदादांची राष्ट्रवादी जिंकणार या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं.

राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांना मोठा धक्का बसला असून भाजपची ताकद वाढल्याचं चित्र आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि विद्यमान आमदार शंकर जगताप यांच्या विरोधात राहुल कलाटे यांनी निवडणूक लढवली होती.

भाजपचे आमदार शंकर जगताप यांनी या आधी पिंपरीत भाजप शंभर जागा जिंकणार असा विश्वास वक्त केला होता. आता राहुल कलाटेंच्या प्रवेशानंतर त्यांनी 128 पैकी 125 जागा जिकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Pimpri Chinchwad Election : कार्यकर्त्यांना न्याय देणार

राहुल कलाटे यांच्या प्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज होतील का असा प्रश्न विचारल्यानंतर शंकर जगताप म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्यावेळी आम्ही त्याच्या पाठीशी नेहमीच राहतो. त्या त्या वेळी आमच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय देऊ. पक्षश्रेष्टींचा आदेश हा भाजपमध्ये अंतिम मानला जातो. जर कुणी पक्षात येत असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करतो.

भाजपमध्ये संघटनात्मक काम केलं जातं. सर्व्हे केला जातो आणि त्यानुसार उमेदवारी दिली जाते असं शकर जगताप म्हणाले. तसेच भाजपमध्ये छुपा पाठिंबा किंवा उघड पाठिंबा असं काही नसतं. पक्ष सांगेल तो आदेश आमच्यासाठी अंतिम असतो असं ते म्हणाले.

Pimpri Chinchwad NCP Vs BJP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र

पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही, भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आलं असून, केवळ दोन जागांवरून तिढा निर्माण झाला आहे.

गुरुवारी रात्री तासभर चाललेल्या चर्चेत, शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार हे सुलक्षणा शिलवंत आणि युवाध्यक्ष इम्रान शेख यांच्या जागांसाठी आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवारांनीही दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत आपल्याला या दोन्ही जागा घ्यायच्याच, असा मेसेज कोल्हे आणि रोहित पवारांकडे दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही येत्या एक-दोन दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.