गळ्यात दोरखंड घालून बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरायला आला, बेंबीच्या देठापासून ओरडत घोषणा दिल्या

पुणे : पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने काल (शनिवारी, ता २७) पोलीस बंदोबस्तात त्याचा उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी म्हणून (Ayush Komkar Muder Case) बंडू आंदेकर सध्या तुरुंगात आहे. बंडू आंदेकरने पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष अर्ज भरल्याची माहिती आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत असताना हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करायला गेला, मात्र, अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरून घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सोमवारी आता (दि. २९) पुन्हा आंदेकर अर्ज भरणार  असल्याची माहिती आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. विशेष न्यायालयाने बंडू आंदेकरसह त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. पण अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने स्पष्ट मनाई केली आहे. तरीही उमेदवारी अर्ज भरायला जाताना बंडू आंदेकर याने घोषणाबाजी करत एंन्ट्री घेतली. ‘नेकी का काम, आंदेकर का नाम’, ‘बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय’, ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत’, ‘मी उमेदवार आहे दरोडेखोर नाही’, ‘वनराज आंदेकर जिंदाबाद’, अशा घोषणा देत कार्यालयात प्रवेश केला. बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे शनिवारी पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यांचा अर्ज हा अर्धवट भरलेला होता. त्यामुळे तो स्वीकारण्यात आलेला नाही. अर्ज भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदत असून, या कालावधीत बंडू आंदेकर पुन्हा अर्ज भरू शकतो असे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी सांगितले आहे.

पुणे आंदेकर कोमकर टोळीयुद्ध ‘निवडणुकचे तिकीट देऊ नका’

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयुष कोमकरच्या आईने माध्यमांशी बोलताना आंदेकर कुटुंबीयांना कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी कळकळीची विनंती केली होती. ‘जर आम्हाला न्याय देता येत नसेल, तर किमान अन्याय तरी करू नका. माझ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं. सत्ता होती म्हणून त्यांनी आजवर सर्व काही केले. कृपा करून त्यांना निवडणुकीचे तिकीट देऊ नका,’ असे आयुषच्या आईने म्हटलं होतं. तसेच, जो पक्ष आंदेकरांना तिकीट देईल, त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेन. मला माझ्या गोविंदाला न्याय हवा आहे. एवढेच मला पाहिजे, अशी भावनिक प्रतिक्रिया संजीवनी कोमकर यांनी व्यक्त केली होती.

पुणे आंदेकर कोमकर टोळीयुद्ध आंदेकर कुटुंबात तिघांनी अर्ज भरला

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली.

सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.

पुणे आंदेकर टोळी: आंदेकरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी?

आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटलं. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी बंडू आंदेकरला राष्ट्रवादी उमेदवारी देणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून आंदेकर कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.