राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतील 67 वॉर्डमधील वारं फिरणार, शिवसेना-मनसेची एकत्र ताकद गेमच
BMC निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election) निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करीत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. यानंतर मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाकरे बंधूंच्या युतीचा थेट परिणाम मुंबईतील तब्बल 67 प्रभागांमध्ये होणार असल्याचं चित्र विधानसभा निवडणुकांच्या प्रभागनिहाय मतदान आकडेवारीतून समोर आलं आहे. विशेषतः मराठीबहुल भागांमध्ये ठाकरेंची युती महायुतीसाठी मोठं आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BMC Election 2026: मराठीबहुल पट्ट्यात ठाकरेंची ताकद वाढली
वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप यांसारख्या मराठीबहुल परिसरात ही युती विशेष प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतविभागणीमुळे दोन्ही पक्षांना फटका बसला होता. मात्र आता मराठी मतांचं एकत्रीकरण झाल्यास त्याचा थेट फायदा शिवसेना (UBT) आणि मनसेला होणार असून, हीच बाब महायुतीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकते.
BMC Election 2026: शिवसेना-मनसेची एकत्र ताकद गेमचेंजर ठरणार?
अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांतील प्रभागनिहाय मतांचा अभ्यास केला असता, मुंबईतील अनेक भागांत मनसे आणि शिवसेना (UBT) यांची मते स्वतंत्रपणे मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येतं. या 67 निर्णायक प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार पुढे होते. मात्र, मनसे आणि ठाकरे गटाची मते एकत्र आल्यास अनेक ठिकाणी महायुतीसमोर आव्हान निर्माण होऊ शकते. शिवसेना-मनसेची एकत्र ताकद गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BMC Election 2026: अनेक प्रभागांमध्ये एकत्रित मते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघात झालेली तिरंगी लढत ही युतीचं महत्त्व अधोरेखित करणारी ठरली. या लढतीत मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत, शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्यात थेट सामना झाला होता. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 191 आणि 192 मध्ये सदा सरवणकरांना मिळालेल्या मतांपेक्षा मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मतांची एकत्रित संख्या जवळपास दुप्पट होती. हे आकडे मनपा निवडणुकीत युती किती प्रभावी ठरू शकते, याचं स्पष्ट संकेत देतात. याच धर्तीवर वरळी आणि दिंडोशी विधानसभा क्षेत्रांतील अनेक प्रभागांमध्येही मनसे–शिवसेना उबाठा यांची एकत्रित मते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक असल्याचं चित्र आहे.
BMC Election 2026: महायुतीसमोर नवं आव्हान
राज–उद्धव ठाकरे यांची युती ही केवळ राजकीय आघाडी नसून, ती मुंबईतील मराठी अस्मितेच्या राजकारणाला पुन्हा धार देणारी मानली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, महायुतीला अनेक प्रभागांमध्ये नव्याने रणनीती आखावी लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.