‘आंदेकरांना कोण मदत करतंय मला माहिती नाही, पण त्यांना राजकीय लोक…’, बंडू आंदेकरांच्या लेकीचा

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात घडामोडींना वेग आला आहे, कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि परिवारातील दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काल (शनिवारी, ता २७) सोनाली आंदेकर (Sonali Andekar) आणि लक्ष्मी आंदेकरने (Lakshmi Andekar) काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तर हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करायला गेला; मात्र अर्ज अर्धवट असल्यामुळे तो भरूनच घेतला गेला नाही अशी माहिती समोर आली आहे. सोमवारी आता (दि. २९) पुन्हा आंदेकर अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर आता बंडू आंदेकरची मुलगी आणि गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळ्या झाडून खून केलेल्या आयुष कोमकरच्या आईने आपल्या वडिलांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं दिसून येत आहे.

Pune Andekar Komkar Gang War : ….तर मी पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करेन

या संपूर्ण प्रकरणाबाबत बंडू आंदेकरच्या मुलीने कल्याणी कोमकरने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. बंडू आंदेकरांनी काल उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर आता त्यांच्या विरोधात थेट त्यांच्या मुलीनेच आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याणी कोमकर यांनी स्पष्ट इशारा दिला असून, “जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बंडू आंदेकरांना उमेदवारी दिली, तर मी पक्ष कार्यालयाबाहेर जाऊन आत्मदहन करेन. याला संबंधित पक्ष पूर्णपणे जबाबदार असेल,” असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आंदेकर टोळीची गुन्हेगारी थांबवायची असेल, तर बंडू आंदेकरांना मत देऊ नका, असे आवाहनही कल्याणी कोमकर यांनी मतदारांना केले आहे. बंडू आंदेकरांनी आतापर्यंत अनेक चुकीची कामे केली आहेत. माझा मुलगा गेला, पण तुमच्या मुलांना अशा वाईट मार्गाला जाऊ देऊ नका, असं आवाहनही कल्याणी कोमकरांनी केलं आहे.

Pune Andekar Komkar Gang War : आंदेकर यांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार

तर बंडू आंदेकरांनी काल (शनिवारी, ता 27) घोषणाबाजी करत येणे चुकीचे असून, या प्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचेही कल्याणी कोमकर यांनी स्पष्ट केले आहे. अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट आवाहन करताना त्या म्हणाल्या, “अजित पवार कोयता गँग थांबवा असे म्हणतात, मग बंडू आंदेकरांना तिकीट देऊ नये.” आंदेकर यांच्या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

“आंदेकरांना कोण मदत करत आहे हे मला माहीत नाही, पण त्यांना राजकीय लोक मदत करत आहेत हे नक्की,” असा आरोपही त्यांनी केला. जर कोणत्याही पक्षाने बंडू आंदेकरांना तिकीट दिले, तर त्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसून, “मी अपक्ष लढणार नाही. मला पक्षाने उमेदवारी द्यावी,” अशी स्पष्ट भूमिका कल्याणी कुमकर यांनी मांडली आहे.

Pune Andekar Komkar Gang War : आंदेकर कुटुंबात तिघांनी अर्ज भरला

बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. आता यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणार आहेत.

Pune Andekar Gang : आंदेकरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी?

आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटलं. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्याचवेळी बंडू आंदेकरला राष्ट्रवादी उमेदवारी देणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून आंदेकर कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा

Comments are closed.