नाराजीनाट्यानंतर देवयानी फरांदे मैदानात, मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं; दिनकर पाटलांकडूनही

नाशिक निवडणूक 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Election 2026) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच, भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटाकडून (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई सुरू झाल्याचं चित्र आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. तर नुकेतच मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी देखील निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय.

Devyani Pharande आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे मैदानात

भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे या सहकुटुंब पश्चिम विभागीय कार्यालयात दाखल झाल्या. विशेष म्हणजे, भाजपमधील प्रवेश आणि नाराजीनाट्यानंतरही फरांदे कुटुंबाने थेट अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

यावेळी देवयानी फरांदे म्हणाल्या, “अजिंक्य निवडणूक लढवत असल्यामुळे मी संपूर्ण कुटुंबासह त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पहाटेपर्यंत चर्चा झाली असून, युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपाचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल. मात्र माझी एकच भूमिका आहे की निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळायला हवा. किमान दोन निष्ठावंत उमेदवारांना संधी मिळावी, हीच माझी मागणी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Dinkar Patil: दिनकर पाटील यांचा भाजपकडून अर्ज

दरम्यान, दिनकर पाटील यांनी देखील भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मनसेमध्ये असताना त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. ठाकरे गट–मनसे युती जाहीर होताच दिनकर पाटील यांनी जल्लोष साजरा केला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात या भूमिकेवरून उलटसुलट चर्चा रंगत आहेत.

Seema Hiray: सीमा हिरे यांच्या दिराचा अर्ज

नाशिकमध्ये आणखी एक लक्षवेधी घडामोड म्हणजे भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दिराचा, माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. सीमा हिरे यांच्या समर्थकांनी यावेळी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले. महायुतीचा निर्णय प्रलंबित असतानाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अंतर्गत राजकारण तापल्याचं चित्र आहे.

Ajay Boraste: शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते आक्रमक

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अजय बोरस्ते म्हणाले, युती संदर्भात आम्ही, महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि नाशिकची जनता संभ्रमात आहे. भाजप युतीबाबत गुळणा धरून बसली आहे. आमदार आणि खासदार हे कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून येतात, पण आज दुर्दैवाने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आहे. युती होणार असेल तर भाजपने स्पष्ट सांगावं. नाही होणार असेल तरीही स्पष्ट सांगावं. शिवसेना निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. शिवसेनेला फेटाळलं गेलं तर आम्ही ताकदीने मैदानात उतरू, असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिलाय.

Vilas Shinde: विलास शिंदेंचे शक्तीप्रदर्शन

तर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेले विलास शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. युतीची घोषणा अद्याप झालेली नसताना शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख विलास शिंदे यांनी बाईक रॅली काढत नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Video: मी नाराज नाही, पण…; नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदेंना अश्रू अनावर, स्पष्टच बोलल्या

आणखी वाचा

Comments are closed.