पुण्यात काँग्रेस-ठाकरे गटाची युती जाहीर, काँग्रेस 60, ठाकरे गटाला 45 जागा, मनसे किती जागांवर लढ

पुणे निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे कॅम्प : उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना अखेर पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाने युतीची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी पुण्यात सोमवारी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. त्यानुसार काँग्रेस आणि ठाकरे गट पुण्यात एकत्र निवडणूक लढणार आहेत. 165 नगरसेवक असलेल्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस 60 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 45 जागा लढवणार आहे. उर्वरित जागांबाबत पुन्हा चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने ठाकरे गटाशी चर्चा सुरु आहे. दुपारपर्यंत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दरम्यान, यावेळी पुण्यातील काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत सुरु असलेल्या चर्चेविषयी विचारण्यात आले. त्यावर काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी सांगितले की, आम्ही गाफील नव्हतो आम्ही दक्ष होतो. बॅकडोर चर्चा सुरू होती. मनसेसोबत अजूनही चर्चा सुरु आहेत. दुपारपर्यंत सगळं स्पष्ट होईल, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

2017 निवडणूक निकाल, पक्ष जिंकलेल्या जागा

भारतीय जनता पक्ष (भाजप) 97
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 39
काँग्रेस 9
शिवसेना 10
मनसे    2
एमिम १
अपक्ष / इतर 4
एकूण 162

पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

पिंपरी-चिंचवडमधील सर्व प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे केली. याच ठिकाणाहून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर यावर एकमत झाले असून आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली जाणार आहे.

अजितदादांना 125, शरद पवार गट 40 जागा लढवणार

मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित पवार गट सुमारे 125 जागा, तर शरद पवार गट 40 जागा लढवणार असल्याचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन पुण्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संयुक्तपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाल्यानंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.