राज ठाकरेंच्या भेटीनंतर वरुण सरदेसाईंना अनिल परबांसोबतच्या मतभेदाचा प्रश्न, उत्तर देत म्हणाले

मुंबई : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी दादर येथे शिवतीर्थ येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वरुण सरदेसाई यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना अनिल परब यांच्यासोबतच्या मतभेदासंदर्भात विचारण्यात आलं. याशिवाय किशोरी पेडणेकर यांच्या उमेदवारीबाबत देखील त्यांना प्रश्न विचारला गेला. वरुण सरदेसाई यांनी अनिल परब यांच्या सोबतच्या मतभेदाच्या प्रश्नावर अधिक भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वरुण सरदेसाई काय म्हणाले?

वरुण सरदेसाई यांनी युती जाहीर झालेलं आहे, जागा वाटप झालेलं आहे, असं म्हटलं. राज ठाकरे यांना प्रचारासंदर्भात आणि निवडणुकीसंदर्भातील निरोप द्यायचे होते, त्यासाठी इकडे आलो होतो. आता जे काही निरोप आहेत ते उद्धव ठाकरे यांना कळवणार असल्याचं म्हटलं.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीबाबत विचारलं असता वरुण सरदेसाई यांनी युती म्हटल्यानंतर काही जागा आपल्या वाट्याला येत असतात, काही जागा सोडाव्या लागतात, असं म्हटलं. आपल्या वाटल्याला आलेल्या जागांसाठी अनेक इच्छुक उमेदवार असतात. प्रत्येक निवडणुकीत हे घडत असतं, प्रत्येक पक्षात हे घडत असतं, हा निवडणुकीचा भाग असतो, असं वरुण सरदेसाई म्हणाले.  लोकांची समजूत काढू, प्रत्येकासोबत बोलू, नाराजी दूर करु त्यांना समजवू असंही त्यांनी म्हटलं.

ठाकरे बंधू एकत्र आल्यानं, मराठी माणूस एकवटल्यानं कार्यकर्त्यांचं धैर्य वाढलेलं आहे. फॉर्म भरेपर्यंत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक असते.

अनिल परब यांच्यासोबतच्या मतभेदासंदर्भात विचारलं असता वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिलं. काल रात्री तीन साडेतीन वाजेपर्यंत उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म वाटले. माझ्या विधानसभा मतदारसंघातील एबी फॉर्म जमा करुन आलो. अनिल परब उरलेल्या विभागातील बाकीचे निर्णय घेत आहेत. अनिल परब यांच्यावर काही जबाबदारी होती, माझ्यावर देखील काही जबाबदारी होती. मतभेदांच्या चर्चांमध्ये कसलं तथ्य नसल्याचं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनी बोलावलं होतं, त्यामुळं आलो होतो, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं. वरळीमध्ये अजून कोणाला ही एबीफॉर्म दिले नाहीत, असं म्हणत सरदेसाई यांनी वरळीतील बंडाळीच्या चर्चा फेटाळल्या. काल रात्री ३ वाजेपर्यंत जागावाटप झाले. उरलेले आज वाटप केले जाणार आहेत, त्यामध्ये वरळी, माहिम, शिवडी, वडाळा, धारावी या जागांचे एबी फॉर्म दिले जातील, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.