मालेगाव महापालिकेवर कुणाची सत्ता? इतिहास, 2017 चा निकाल ते यंदाचं राजकीय गणित

मालेगाव महानगरपालिका: राज्यातील 29 महानगरपालिकांसह मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय लढतींपैकी एक असलेल्या मालेगाव महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तब्बल अडीच ते तीन वर्षांपासून सुरू असलेली प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार असून, 21 प्रभागांतील 84 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Malegaon Mahanagarpalika: 1100 कोटींचे बिग बजेट, 21 प्रभागांतून 84 नगरसेवक

उत्तर महाराष्ट्रातील सुमारे 1100 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाची मालेगाव महानगरपालिका ही राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांपैकी एक मानली जाते. आगामी निवडणुकीत 21 प्रभागांमधून 84 नगरसेवक निवडले जाणार असून, त्यासोबत पाच स्वीकृत सदस्य असतील. त्यामुळे सत्तेची गणिते अधिकच रंजक ठरण्याची शक्यता आहे.

Malegaon Mahanagarpalika History: मालेगाव महापालिकेचा इतिहास

मालेगाव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी शहर आहे. हातमाग, कापड उद्योग आणि व्यापारी केंद्र म्हणून मालेगावची ओळख जुनी आहे. लोकसंख्या आणि शहराचा विस्तार वाढत गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची गरज निर्माण झाली. मालेगावमध्ये सुरुवातीला नगरपरिषद (Municipal Council) अस्तित्वात होती. नगरपरिषद काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, कर वसुली, प्राथमिक सेवा या कामांची जबाबदारी नगरपरिषदेकडे होती. औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे नगरपरिषद अपुरी पडू लागली. 17 डिसेंबर 2001 रोजी मालेगाव नगरपरिषदेला अधिकृतपणे महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. यानंतर मालेगाव महानगरपालिका (Malegaon Municipal Corporation) अस्तित्वात आली. ही महानगरपालिका Bombay Provincial Municipal Corporations Act, 1949 अंतर्गत कार्यरत आहे.

Malegaon Mahanagarpalika: 2022 पासून प्रशासकीय राजवट लागू

मालेगाव महापालिकेची शेवटची निवडणूक मे 2017 मध्ये झाली होती. नियमानुसार मे 2022 मध्ये पुढील निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक न होता 13 जून 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. सुरुवातीला तत्कालीन महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी हे प्रशासक म्हणून कार्यरत होते. डिसेंबर 2023 पासून सध्याचे आयुक्त रवींद्र जाधव हे प्रशासक म्हणून कार्य पाहत आहेत. परिणामी, मालेगाव महापालिका गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना चालवली जात आहे.

Malegaon Mahanagarpalika: 2017 साली काँग्रेसची सत्ता : ताहेरा शेख महापौर

2017 च्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली होती. दिवंगत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख या त्या काळातील महापौर होत्या. पुढील काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आणि सत्तासमीकरणे बदलली.

Malegaon Mahanagarpalika: 2017 मधील पक्षीय बलाबल

2017 च्या मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 84 जागांसाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत

काँग्रेस – 28 जागा (सर्वात मोठा पक्ष)

राष्ट्रवादी काँग्रेस – 26 जागा

शिवसेना – 13 जागा

भारतीय जनता पार्टी – ९ जागा

AIMIM – 7 जागा

जनता दल – 7 जागा

या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मते मिळाली होती. त्यामुळे 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली.

Malegaon Mahanagarpalika: मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मधील नेतृत्व

महापौर – ताहेरा शेख रशीद (काँग्रेस)

उपमहापौर – निलेश अहेर (शिवसेना)

महानगरपालिका आयुक्त – रवींद्र जाधव (IAS)

सध्या मालेगाव महानगरपालिका प्रशासकाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 2025–26 या कालावधीत अपेक्षित असून, त्यात मालेगाव महानगरपालिकेचाही समावेश आहे.

Malegaon Mahanagarpalika: राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख

मालेगाव महानगरपालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून, राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण करणारी महापालिका म्हणून ओळखली जाते. येथील राजकीय नेतृत्वाचा इतिहास इतर शहरांपेक्षा वेगळ्या वाटेने गेलेला आहे.

Malegaon Mahanagarpalika: स्थानिक नेतृत्वाची मजबूत पकड

मालेगावच्या राजकारणावर सुरुवातीपासूनच स्थानिक नेते, अपक्ष गट आणि स्थानिक संघटनांचा प्रभाव राहिला आहे. इतर महानगरपालिकांप्रमाणे येथे राष्ट्रीय पक्षांचे सरळ आणि दीर्घकालीन वर्चस्व दिसून येत नाही. स्थानिक प्रश्न, सामाजिक समतोल आणि जनाधार यावर आधारित नेतृत्व येथे विकसित झाले आहे.

Malegaon Mahanagarpalika: मुस्लिम नेतृत्वाचा प्रभाव

मालेगाव हे अल्पसंख्याकबहुल शहर असल्याने येथील राजकारणात मुस्लिम समाजातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेक कार्यकाळांमध्ये मुस्लिम नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली महापालिकेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे मालेगाव महापालिका निवडणुकीकडे राज्यभरातून विशेष लक्ष दिले जाते.

मालेगाव महानगरपालिका: AIMIM चा उदय

कालांतराने मालेगावच्या राजकारणात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाने प्रभावी उपस्थिती निर्माण केली. स्थानिक विकास, अल्पसंख्याक व ओबीसी प्रश्न यांना केंद्रस्थानी ठेवत मजलिसने महापालिकेतील सत्ता आणि विरोधी बाकांवर आपली ठोस भूमिका प्रस्थापित केली.

Malegaon Mahanagarpalika: काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका

पूर्वीच्या काळात मालेगावच्या राजकारणात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रभाव लक्षणीय होता. मात्र, कालांतराने अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाचा अभाव आणि संघटनात्मक कमजोरी यांमुळे या पक्षांचा प्रभाव कमी होत गेला.

Malegaon Mahanagarpalika: भाजप आणि शिवसेनेची मर्यादित उपस्थिती

भाजप आणि शिवसेनेने मालेगावमध्ये आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले असले, तरी इतर शहरांप्रमाणे येथे ठोस सत्ता स्थापन करण्यात त्यांना मर्यादा आल्या. तरीही काही प्रभागांमध्ये या पक्षांचे प्रतिनिधित्व राहिले असून, युती व आघाडीच्या माध्यमातून राजकीय डावपेच खेळले गेले आहेत.

Malegaon Mahanagarpalika: लोकसंख्या झपाट्याने वाढली

2011 च्या जनगणनेनुसार मालेगाव शहराची लोकसंख्या 4 लाख 81 हजार 228 इतकी होती. मात्र, 2025 च्या अंदाजानुसार ही लोकसंख्या सुमारे 6 लाख 87 हजारांपर्यंत पोहोचली आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या प्रश्नांवर निवडणुकीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

Malegaon Mahanagarpalika: यावेळी लढत अधिकच रंगणार

निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, इस्लाम पार्टी आणि एमआयएम यांच्यात सामना होणार आहे. यात इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली असून ‘मालेगाव सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करून त्याद्वारे ते 84 जागांवर लढणार आहे स्थानिक प्रश्न, विकासकामे, प्रशासकीय राजवटीतील कारभार आणि धार्मिक-राजकीय समीकरणे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत.

Malegaon Mahanagarpalika: मालेगावच्या राजकारणासाठी निर्णायक क्षण

अडीच ते तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर होणारी ही निवडणूक मालेगावच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. सत्ता कोणाच्या हाती जाणार, जुनी समीकरणे टिकणार की नवे राजकीय पर्याय पुढे येणार, याचा फैसला मतदार करणार आहेत.

आणखी वाचा

Nashik Mahanagarpalika: नाशिक महानगरपालिका : इतिहास, सत्तासमीकरणे आणि वर्चस्ववाद, भाजपचा इतिहास राज-उद्धव ठाकरेंची युती पुसणार?

Comments are closed.